किरकेट मस्त खेल हाय

    दिनांक :02-Jun-2019
मौेके पे चौका!  
- कौतिकराव
 
आता आपल्या देसात किरकेट अन्‌ राजकारन हा धर्म हाय आपला. देशात कुठीना कुठी किरकेटच्या मॅचेस सुरू रायते अन्‌ कुठीना कुठी, कायच्या ना कायच्या निवडनुका सुरू असतेत... अगदी काहीच नाही त सहकारी सोसायट्याचे तबी इलेक्शन असतेतच. किरकेटच्या मॅचेस नाहीच काही त गल्लीत रबरी बॉलच्या तबी रायतेतच...
 
आता त साहेबाच्या देशात किरकेटचा वर्ल्ड कपच सुरू हाय. नुकत्याच मोठ्या निवडनुका झाल्या न आता हे विराट पर्व सुरू झालं हाय. त अस्या माहोलमंध एका शायेत एक शिक्षनाधिकारी शाळा तपासाले गेला. त तिथला मास्तर म्हने का, साहेब तुमी जादा टायम वाया नोका घालवू, काहून का तुमाले किरकेटची मॅच पहाची असन टिव्हीवर. त्याच्यापायी तुमी असं करा का या एकाच पोराले सवाल करा. थो हुशार हाय. चटकन्‌ उत्तर देईल अन्‌ तुमी मोकये व्हान... 

 
 
सायबाले पटलं न सायबानं त्या पोराले सवाल केला. सहां सखं किती रे? त थो पोरगा म्हने बहात्तर!
भले बहाद्दर! सहा सहा छत्तीस होते ना... तो पोरगा म्हने तुमी मले का इचारलं? साहीं सखंम्‌ किती? त म्या बहात्तर मन्ल! साहेब भडकला. म्हने, सातव्या वर्गात हायस न तुले बेचे फाडे नाही येत? तुले शायेतून काढूनच टाकतो. त तो पोरगा हासत म्हने, काढून टाका ना. मी काही ओरीजनल इद्यार्थी नाही. मी पाटलाच्या घरी गुरं राखतो. आज किरकेटची मॅच हाय टिव्हीवर, पाटलाचा पोरगा थे पाहत हायन थो मले म्हने का, तू जाय शाळेत. म्हून मी आलो...
 
मंग शिक्षन अधिकारी अधिकच भडकला मास्तरवर. म्हने, तुमच्या शाळेतला विद्यार्थी बदलतो अन्‌ तुम्हाला माहिती नाही राहत? थांबा तुम्हाला डिसमीसच करतो... तर मास्तर म्हने, कराना सर... माहं का तेडं होनार? मी काही ओरीजनल मास्तर नाही अठीचा. मास्तर घरी किरकेटची मॅच पाहात हाय वल्ड कपची. मी त्याच्या घरी कामाले असतो, तो म्हने का तू आज माह्या ठिकानी मास्तर म्हून जा, म्हून मी आलो.
 
मंग त शिक्षनाधिकार्‍याचा अखीनच दिमाक सरकला. थो हेडमास्तरकडं गेला न म्हने, तुमच्या शाळेतला विद्यार्थी बदलतो, मास्तर नकली असतो अन्‌ तुम्हाला काहीच माहिती नाही? थांबा या शाळेचे मान्यताच रद्द करण्याची शिफारस करतो. किमान तुमची नोकरी तर गेलीच समजा... हेडमास्तर म्हने, करा ना तुमाले जे कर्‍याचं ते... मी काही खरा हेड मास्तर नाहीच. खरा हेडमास्तर घरी टिव्हीवर किरकेटची मॅच पाहात हाय. मी त्याहिच्या शेतावरचा सोकारी व्हय. हेडसर म्हने, आज शिक्षनाधिकारी येनार हाय तपासायाले शाया. तू जा माह्या ठिकानी न हेडसर म्हून बस. म्हून मी आलो...
 
मंग शिक्षनाधिकारी म्हनाला, ‘‘बरं हाय रे तुमचं... वाचले लेकहो तुमी... मी जर खरा शिक्षनाधिकारी असतो ना त तुमची काही खैर नोती. खरा शिक्षनाधिकारी घरी किरकेटची मॅच पाहात हाय न मी त्याच्या डरायवर हावो, तो मले म्हने आज शाया तू तपासून ये माह्या ऐवजी...!’’
त हे असं हाय. आता किरकेटचा मौसम हाय, पावसायात धारा नाही; पन धावा बरसनार हाय. त आपूनबी असी बॅटींग करूच ना! भेटू मंग उद्या!