अग अग म्हशी...

    दिनांक :02-Jun-2019
ऐन बहरातला सचिन मैदानात उतरल्यावर शोएब अख्तरसारख्या तीव्र गती आणि मंदत मती गोलंदाजाचे जे काय होत होते ते सध्या सर्वच विरोधी पक्षांचे झाले आहे. म्हणजे आता विरोधी पक्षच राहिलेला नाही. कारण त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळावे इतकेही उमेदवार निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसचे हे कलेवर संसदेत येती पाच वर्षे वाहून नेण्यासाठी राष्ट्रवादीचे चार खांदेकरी लागणार आहेत. त्यासाठी मग राहुलबाबा (आता हे कोण, असे विचारू नका.) शरद पवारांना भेटले. राष्ट्रवादीचे विलिनीकरण कॉंग्रेसमध्ये करावे, असा तोडगा सुचविला गेल्याच्या बातम्या आल्या. आता कॉंग्रेसींना हे कधी कळणार की घड्याळाचा काटाच गोतास काळ आहे. यावेळी लोकसभेत राज्यातील कॉंग्रेसचे उमेदवारही पवार साहेबांनी ठरविल्याची चर्चा आहे. आता मात्र त्यांचीही अवस्था आधीसारखी राहिली नाही. अगदीच राम गणेश गडकर्‍यांच्या भाषेत सांगायचे झाले तर जिथे सुपातून मोती पाखडले त्या घरात जोंधळेही मिळेना, अशी पवार साहेबांची (त्यांना साहेब म्हणणे हा आपला सुसंस्कृतपणा) अवस्था झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र हे त्यांच्यासाठी हिरवे रानच होते. तिथेही ‘मावळ मावळ क्रांती’ झाली. त्यांचा पार्थ रणांगणी पडला. कदाचित चक्रव्यूहात शिरायचे कसे ते आजोबा पवारांनी त्याला सांगितले असेल. बाहेर कसे पडायचे हे सांगितले नसेल त्यामुळे त्याचा अभिमन्यू झाला. (की साहेबांनीच केला?) तर त्यामुळे आता घड्याळ पाटलांच्याही पाट्या वाजल्या आहेत. आता पार्टी चालविणे हे सकाळी उठण्याची सवय असली तरीही सोपे काम राहिलेले नाही, हे पवारांना (समस्त) पटले असावे. कारण ज्यांची सकाळच मुळात बारा वाजता होते, अशांच्या सेनेची मदत यावेळी घड्याळ पाटलांना घ्यावी लागली. आता तर विधानसभेसाठी तेही आघाडीत यायला तयार नाहीत. मोडेन पण वाकणार नाही, अशी मनसे बात आहे. आता दुकान फुटाण्याचेही राहिले नाही; पण ऐट मात्र बादशहाची आहे. त्यांच्याकडे निरुपायाने बाळच काय तो नांदत राहिला आहे. त्यामुळे एकटाच लढीन( अन्‌ सपाटून पडीन) हे त्यांचे विधानसभेसाठी घोषवाक्य आहे.

 
 
कॉंग्रेसींवर आता काय काय पाळी आली आहे. ते आता लपत-छपत कुणाकुणाच्या माड्या चढू लागले आहेत. राहुलबाबा पवारांकडे जाऊन आले. ते माणिकराव कृष्णकुंजच्या पायर्‍या चढून आले. दिलीप पाटील आपले वळसे घेतच आहेत. रडताही येत नाही अन्‌ सोडताही येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. घरात लग्नकार्य असताना कुणा ज्येष्ठाचा मृत्यू व्हावा, अशी त्यांची शोचनीय अवस्था झाली आहे. नवरदेव मांडवात असताना तिरडी कशी आणायची? मग मढं झाकून कार्य साजरे करायचे असते. तसेच राज्यातील कॉंग्रेसींचे झाले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे मढे झाकून विधानसभेचे कार्य उरकावेच लागणार आहे. पडणार हे माहिती असूनही लढावे लागणारच आहे. त्यासाठी मग त्यांना, ‘अग अग म्हशी, मला कुठे नेशी’ म्हणत कुणाकुणाच्या दाराशी जावे लागत आहे. अगदी कॉंग्रेसींबद्दल स्नेहाचा अंधारच असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्याही. डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते, कॉंग्रेस हे जळते घर आहे, इतकेच त्यांच्या या नातवाला आठवते. त्यामुळे झाला फायदा भाजपाला झाला तरी चालेल; पण आपण कॉंग्रेसला मदत नाही करणार, असे त्यांचे सूत्र आहे. त्यामुळे ते आता कॉंग्रेसशी समान पातळीवर बोलणी करण्याची भाषा करत आहेत. त्यांची मागणी सहन करणे तर दूरच; पण ऐकावी अशीही असणार नाही. एखादा रिक्षेवाला किंवा ऑटोवाला त्यालाही सवारी घ्यायची नसेल तर अर्धा फर्लांग अंतराचेही दीड-दोनशे रुपये सांगतो. त्यामुळे मग प्रवासी आपला हळूच पुढे सरकतो. एखाद्याने अगतिकतेने तितके भाडे दिलेच तर चांगलेच अन्‌ भाव ऐकून त्याने अशी कल्टी मारली तर उत्तमच! नेमके तसेच बाळासाहेबांचे आहे. कॉंग्रेसवाल्यांची अवस्था बिकट आहे; तरीही ते एकदम भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानच्या टीमशी हरावे, अशा स्थितीत आलेले नाहीत. त्यामुळे ते वंचितांचे संचित काही भरणार नाहीत अन्‌ मग आघाडीचा प्रकाश साराच्या सारा कुठे पडेल, हे नव्याने सांगायला नको. तरीही आता कॉंग्रेसवाले समान पातळीवर त्यांच्याशी बोलायला जातात की काय, ते बघावे लागेल.
आता कॉंग्रेसी नेत्यांना करण्यासारखे एकच उरलेले आहे आणि तेच ते करत आहेत. ते म्हणजे जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे. अर्थात हे राजीनामे पक्षातल्या पदांचे आहेत. जिथे त्यांची सत्ता आहे तिथल्या पदांचे राजीनामे कुणी द्यायला तयार नाहीत. गेहलोत, कमलनाथ त्या बाबत गप्प आहेत. गेहलोतांना स्वत:च्या मुलालाही निवडून आणता आले नाही. तरीही ते जबाबदारी स्विकारून राजीनामे देऊ करत नाहीत. सुखनैव सत्तेत असताना अशा जबाबदार्‍या स्विकारून राजीनामे दिले असते कॉंग्रेसींनी, तर पक्षाचा असा घोटाळा झाला नसता. आता कॉंग्रेस हाच एक महाघोटाळा झाला आहे. सोनिया थकल्या आहेत अन्‌ राहुल कधी पिकलाच नाही, त्यामुळे विकला नाही. म्हणून आता त्यानेही राजीनामा दिला आहे. अर्थात राजीनामाही पुन्हा अग, अग म्हशी... असाच असतो. राजीनामा असे नाव असले तरीही तो देताना एक नाराजी असते. समोरच्याने ती नाराजी दूर करतो; पण तू जाऊ नकोस, असे म्हणावे, अशी राजीनामा देणार्‍याची इच्छा असतेच. अर्थात चांगल्या प्रशासकाने राजीनामा देणार्‍याची नेमकी खंत काय, हे जाणून घ्यायलाच हवे. त्यामुळे त्या व्यवस्थेतल्या त्रुटी कळतात... आता ज्यांची व्यवस्था आहे, त्यानेच राजीनामा दिल्यावर नाराजी कोण जाणून घेणार आहेत? तरीही राहुलने राजीनामा दिल्याबरोबर कॉंग्रेसचे तमाम नेते भररस्त्यात अचानक अंगावरून कपडे गायब व्हावे, तसे झाले आहे. कॉंग्रेस विसर्जित करण्याची महात्मा गांधी यांची इच्छा राहुल गांधींच्या हस्तेच पूर्ण व्हावी, अशी नियती दिसते आहे. राहुलबाबा राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यापेक्षा त्यांनी कॉंग्रेसच विसर्जित करून टाकावी. कदाचित पवार भेटीत शरदरावांनी हीच मागणी केली असेल. विरोधी पक्ष नेतेपद मिळावे म्हणून राष्ट्रवादी विसर्जित करण्यापेक्षा कॉंग्रेसच राष्ट्रवादीत विसर्जित करा अन्‌ विरोधी पक्षनेतेपद सुप्रियाला द्या आणि मग मी तर पार्टीचा अध्यक्ष आहेच, असे पवार म्हणाले असतील. कॉंग्रेसची सोनूबाई हाती कथलाच्या वाळ्या घालून आता कुठे कुठे जात आहे. कधी तिने त्याग करून पंतप्रधानपद सोडले होते, आता विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांना वणवण हिंडावे लागत आहे. त्यात मग त्यांचे विविध ठिकाणचे प्रदेशाध्यक्ष राजीनामे घेऊन उभे आहेत. आता त्यांना प्रश्न पडला आहे की राजीनामा द्यायचा कुणाकडे? कारण राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिला आहे. प्रत्येकालाच आता जबाबदारीतून मोकळे व्हायचे आहे. तिकडे रुग्णालयात लालूंना धक्का बसला आहे. ते म्हणे किंचाळतात, त्यांना कसले कसले भास होतात. त्यांनी एक वेळचे जेवणही सोडले आहे म्हणतात. कधीकाळी नाही नाही ते खाल्ले, भस्मारोग झाल्यागत खाल्ले म्हणून आता ही वेळ आलेली आहे. त्यांनाही कुणीतरी चार घास खावून घ्या, असे म्हणायला हवे. कारण त्यांचाही हा अन्नत्याग मनस्ताप ‘अग अग म्हशी’ थाटाचाच आहे. न्यूजमध्ये राहण्यासाठी राजीनाम्यापासून असे काय काय करावेच लागणार बाबा!