उरुग्वे जेतेपदाचा दावेदार नाही : तबारेज

    दिनांक :20-Jun-2019
- कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा
पोटरे अलेग्रे,
आमचा उरुग्वे संघ कोपा अमेरिका-2019 चषक फुटबॉल स्पर्धेतील जेतेपदाच्या शर्यतीत नाही, असे प्रतिपादन या उरुग्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक ऑस्कर तबारेज यांनी केले आहे. दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक प्रतिष्ठेची समजली जाणारी ही फुटबॉल स्पर्धा सध्या ब्राझीलमध्ये खेळली जात आहे.
 
 
 
उरुग्वे संघाला स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इक्वाडोरविरुद्ध 4-0 असा मोठा विजय मिळाला होता. आता त्याची पुढील लढत जपानविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही उरुग्वेला विजय मिळाला तर हा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. आधी आम्ही साखळी फेरीतून पुढील फेरीत जाण्यासाठी इच्छुक आहोत, त्यानंतर आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करू. सध्या आम्ही आणखी पुढील फेर्‍यांचा विचार न करता समोर येणार्‍या सामन्यांबाबत विचार करीत आहोत, असेही तबारेज म्हणाले.
उरुग्वेचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जपानचा संघ या स्पर्धेत पाहुणा संघ म्हणून सहभागी झाला असून याआधीच्या सामन्यात त्यांना विद्यमान विजेत्या चिली संघाकडून 0-4 अशी मात खावी लागली आहे. अशा परिस्थितीतही तबारेज यांचे म्हणणे आहे की, आम्ही आशियातील या संघाला कमी लेखत नाही. कारण, याच संघाने ऑक्टोबरमध्ये झालेल्या मित्रता सामन्यात चिलीचा 4-3 असा पराभव केला होता.
जपानचा संघ कडवी झुंज देणारा आहे. आमच्यासाठी हा एक कठीण सामना राहणार आहे आणि आम्हाला त्या संघाचा सन्मान करावाच लागेल, असेही तबारेज यांनी म्हटले आहे.