व्यवस्थेचा मेंदूज्वर...

    दिनांक :20-Jun-2019
मरण अटळच असतं, कुठल्याही जिवाच्या जन्मासोबतच त्याच्या मरणाचाही जन्म झालेला असतो... असा एका गरुडपुराणातील संस्कृत सुभाषिताचा अर्थ आहे. त्यामुळे जिवांचे पार्थिव सोडणे अटळच आहे. मात्र त्याचे कारण काय, त्याचाच तपास काढायचा असतो. किंवा मग मृत्यूच्या कारणातच लोकांना रस असतो. कुणी गेल्याची वार्ता ऐकविली, तर पहिला उद्गार आश्चर्याचा असतो, ‘‘अरे! आत्ता तर होते...’’ किंवा मग ‘‘काय झाले होते?’’ असे विचारले जाते. दोन्हीचा अर्थ एकच की, मरणाचे कारण काय? त्यावरून हळहळ आणखीच वाढत असते. बिहारमध्ये बालकांंचे मेंदूज्वराच्या तापाने बळी घेतलेत. सरकारी आकडेवारीच 100 च्या वर आहे. तीही बिहारमधील सरकारची आहे. गेल्या काही वर्षांत बदलत्या बिहारची जाहिरात केली जात असली, तरीही एखाद्या गोष्टीचा पोत आणि माती बदलत नाही. त्यामुळे बिहारात बेदरकारी ही काही नवी बाब नाही. मेंदूज्वर म्हणजेच बिहारी भाषेत त्याला चमकी बुखार म्हणतात. 

 
 
गेल्या वर्षीही याच तापाने तिथे शंभराच्या आसपास बालकांचा बळी घेतला होता... अशा घटना देशात कुठे ना कुठे घडतच असतात. संसर्गजन्य रोगांचा फैलाव होतो आणि मग या साथीत अनेकांचे बळी जातात. कधी त्यात सरकारचे दुर्लक्ष असते, सत्ताधार्‍यांची बेपर्वाई असते, तर बहुतांश वेळा प्रशासनाची दिरंगाई, आळस आणि भ्रष्टाचार असतो. लष्कर, शिक्षण आणि आरोग्य याबाबत भ्रष्टाचार होऊ नये, मात्र याच क्षेत्रांत तो सर्वाधिक होतो. आता बिहारात या सार्‍याचेच प्रमाण पराकोटीचे. तिकडे मुलं पटापट दगावत होते आणि इकडे बिहारचे आरोग्यमंत्री भारत-पाकिस्तान सामन्याची काळजी करत होते. स्कोअर काय, त्यात त्यांना उत्सुकता होती...
 
मागे उत्तरप्रदेशात सलाईन नसल्याने बालके दगावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने धाव घेतली. परिस्थिती हाताळली. त्यानंतर चौकशीही केली आणि चूक असणार्‍यांना शासनही केले. मात्र, प्रशासन हे सर्वदूर असेच. केंद्र सरकारने आता अशा भ्रष्ट आणि बेपर्वा अधिकार्‍यांविरुद्ध मोहीमच उघडली आहे. त्यामुळे देशभरात एक संदेश नक्की जातो आहे. त्यामुळे प्रशासनात गतिमानता येईल. अधिकार्‍यांची संवेदनशीलता जागी होईल. बिहारात व्यवस्थेचाच गोंधळ आहे. मुळात देशात आरोग्यव्यवस्थेकडेच आतावर दुर्लक्ष केले गेले. आरोग्य ही आता मूलभूत गरज झालेली आहे. चांगल्या आरोग्यसेवा या देशाच्या प्रगत असण्याचे लक्षण मानले जाते. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सार्वजनिक रीत्या फैलावणारे रोग हे अस्वच्छतेमुळे फैलावत असतात. डास त्याला मूळ कारण. अस्वच्छता आणि त्यातून निर्माण झालेले डास यामुळे आतावर देशात साथीचे रोग पसरले आणि माणसं पटापट मेलीत, असे अनेकवार झालेले आहे. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. रालोआच्या पहिल्या सत्ताकाळात, पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही मोहीम चालविली. त्या वेळी अंध विरोधकांनी त्यांच्यावर ‘इव्हेंट देणारा नेता’ अशी टीका केली होती. मात्र, त्या वेळी केलेल्या भाषणात मोदींनी स्वच्छता या विषयाचा किती सखोल आणि हळव्या जाणिवेने अभ्यास केला होता, हे दिसते.
 
अस्वच्छतेमुळे रोग फैलावतात, उदासी पसरते आणि मग कार्यक्षमता कमी होते, सकारात्मकता कमी होते, असे ते म्हणाले होते. ते खरेच आहे. बिहारात पसरलेला हा चमकी ताप डासांमुळेच आहे. देशाच्या जवळपास सर्वच भागात ही समस्या आहे. मागे डेंग्यू, स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला होता. चिकनगुनियाच्या तापाने थैमान माजविले होते. केरळातही साथीच्या तापाने गेल्या पावसाळ्यात अनेक मृत्यू झाले. आता बिहारात तेच होते आहे. उत्तरप्रदेशात प्रशासकीय आळस आणि नियोजनशून्यता, बेपर्वाई ही कारणे होती, तर आता बिहारात मुळातच आरोग्यसवा या क्षेत्राकडेच असलेले एकुणातच दुर्लक्ष, तो विषयच गांभीर्याने न घेणे, हीच कारणे दिसताहेत.
 
अचानक तापाची साथ आली नि मग अशा वेळी वाढत्या रुग्णसंखेला कसे हाताळायचे, यासाठी तिथली आरोग्ययंत्रणा सिद्धच नव्हती. त्यांच्याकडे पुरेशी औषधेही नव्हती. तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टर्स नव्हते. जे होते त्यांच्यात तळमळ, गांभीर्य यांचा अभावच होता. त्यामुळे व्हायचे तेच झाले. बालके दगावली. त्यावरही तिथले मंत्री आताही हेच म्हणत आहेत की, वाढते तापमान आणि इतर कारणांनीच मुले मेलीत... मुळात बिहारमधील कमालीची अस्वच्छता, त्यात तिथली मुलं या मोसमात होणारी लीचीची फळे खातात. त्या फळातील द्रव्ये डासांमुळे फैलावणार्‍या संसर्गजन्य रोगांच्या विषाणूंना बळ देणारीच असतात. त्यात या काळात सपाट्याने फैलावणारे रोगजंतू आणि त्यात वैद्यकीय सेवेकडे पाहण्याचा गांभीर्याचा अभाव, यामुळे बिहारात हे बळी गेले.
 
खरेतर अशा साथीच्या रोगांवर संशोधन व्हायला हवे. औषधे निर्माण व्हायला हवीत. नाहीतर स्वाईन फ्लूच्या नावाने अमेरिकादी देश त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त औषधांचा साठा भारतीयांना घाबरवून त्यांच्या गळी उतरवीत असतात. देवी, पटकी अशा रोगांवर आता आपण नियंत्रण मिळविले आहे. अभ्यास आणि नवे शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नवे शोध लागले की, त्याची अंमलबजावणी हीदेखील भारतासारख्या देशात कठीण असते. एकतर हा देश भूगोलाने खूप मोठा आहे आणि इथे वैविध्यही खूप आहे. लोकांमध्ये अनेक समज आणि श्रद्धा-अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. त्यामुळे अगदी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या बाबतही अनेक गैरसमज पसरले होते. ते दूर करून परिवार नियोजन ही संकल्पना रुजवायला चार दशके लागलीत. त्यामुळे साथीच्या रोगावर हमखास इलाज करणारी औषधे शोधण्यासोबतच साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय शोधले गेलेच पाहिजेत, मात्र आतावर ते झाले नाही. सार्वजनिक आरोग्यसेवेकडे दुर्लक्षच केले गेले.
 
आधी स्वच्छता सांगत मग गेल्या सत्ताकाळात मोदींनी नंतर ‘आयुषमान भारत’सारखी योजना आणली. त्याचा लाभ आता सामान्यांना होतो आहे. रस्ते, स्वच्छ पाणी, चांगली घरे आणि आरोग्याच्या सोयी या बाबींवर या सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच बिहारात घटना घडताच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बालमृत्यू तपासणीसाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साथीच्या रोगांवर अभ्यास करून उपायांचा शोध आणि त्यांची तातडीने अंमलबजावणी हे आवश्यक आहे. त्यातही ग्रामीण भागात फैलावणार्‍या रोगांची दखल तातडीने घ्यायला हवी. कुटीर रुग्णालये, तालुका स्तरावरील सरकारी दवाखाने हे बर्‍यापैकी सुसज्ज हवेत.
 
महाराष्ट्रात मलेरिया नियंत्रणासाठी तसे एक वेगळे खातेच निर्माण करण्यात आले होते. आताही मलेरियावर पुरेसे नियंत्रण मिळविता आलेले नाही, मात्र ते खाते आता बंद करण्यात आले आहे. मलेरियाइतकीच मेंदूज्वराचीही दखल अगदी देशभर घेतली जायला हवी. बिहार, झारखंड, राजस्थान, हरयाणा यासारख्या राज्यांत जिथे या रोगाला पोषक असेच वातावरण आहे, प्रशासन बेपर्वाच आहे, तिथे खास काळजी घेतली जायला हवी. ती तशी घेतली गेली नाही. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी तिथे शेकड्याने बालके दगावली. ज्वर मेंदूत जाण्याआधी व्यवस्थेच्या डोक्यात काही शिरेल का?