पावसांच्या सरींनी हे मन बावरे...

    दिनांक :20-Jun-2019
अंजली आवारी
8600291527
 
यावर्षीच्या कडक उन्हाळ्यानंतर आता चाहूल लागलीय ती पावसाच्या सरींची. सूर्यकिरणांनी झालेली अंगाची लाही लाही या थंडगार पावसाच्या सरींनी मनाला शांत करून जाते. तो थंडगार वारा, गडगडत्या ढगांचा आवाज, कडाडणारी व लखलखती वीज हे सर्व आपणास निसर्गातील बदलांची जाणीव करून देतात व त्या थंडगार पावसाच्या सरी मनाला विसावा देतात. 

 
 
पावसाच्या सरींच कोरड्या पडलेल्या मातीशी मिलन झाल की, तो मातीचा दरवळता सुगंध मनाला अगदी भुरळ पाडून जातो. निसर्ग पुन्हा तेवढ्याच तत्परतेने नवी पालवी फुलविण्यास सज्ज झालेला असतो. कोरड्या पडलेल्या त्या खोडांवर नवी पालवी अगदी दिमाखात मिरविताना दिसते. निसर्गाचा हा बदलता रंग बघून आपल्याही अंतरंगातील भावनाना उधाण येत. पाऊस आला की त्याच्या सरीमध्ये अगदी िंचब भिजून नाचावं, अशी इच्छा उफाळून येते व निसर्गाच्या या सौंदर्याचा अभिमान वाटतो. त्याच्या त्या सौंदर्याने मन भारावून जाते.
 
प्राणीतर पाऊस पडल्यानंतर अगदी सुटकेचा श्वास सोडतात व उंच भरारी घेत थंडगार वातावरणात विहार करतात. पक्ष्यांचा किलबिलाट, मोरांचा फुललेला पिसारा या सर्व गोष्टी मनाला सुखावतात. पक्ष्यांचा तो कलकलाट जणू निसर्गावर आनंदी असण्याची ग्वाही देत असतो. यातूनच त्याचे व निसर्गाचे एक घट्ट नातं दिसून येतं. त्याची एकमेकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती दिसते व दु:खानंतर आनंद व आनंदानंतर दु:ख या निसर्गाच्या नियमांची पुन्हा जाणीव होते.
 
पावसाळ्यात कोरडी पडलेली नदी, नाले, तलाव पुन्हा खळखळत वाहू लागतात. तहानलेले आसुसलेल्या वाटसरूसारखे ते पावसाची वाट पाहत असतात व जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अगदी तृप्त होऊन खळखळाच्या आवाजाने आनंद साजरा करतात. त्या खळखळत्या आवाजाद्वारे जणू काही ते आपल्या नृत्याच सादरीकरणच करीत असतात. पाण्याचे साठे तुडुंब भरून वाहू लागले की, आजूबाजूचा परीसर अगदी रंगीबेरंगी शालू घालून नव्या नवरीसारखा मिरविताना दिसतो.
 
कधी कधी निसर्गाच्या या नियमांचे आश्चर्य वाटते तर कधी त्याच्या सौंदर्याचा हेवासुद्धा वाटतो. किती तत्परतेने व निरंतरतेने तो न चुकता आपल काम करीत असतो ना. त्याच्या या कार्याला शतश: नमन करते व आपण सगळे मिळून या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटू या अशी कामना करते.