तो आणि ती!

    दिनांक :20-Jun-2019
नीता राऊत
 
आपल्या आयुष्यात जन्मतः आणि रक्ताच्या नात्याची अनेक माणसं असतात... पण आपल्या जन्मानंतर ज्या लोकांना आपण निवडतो, ज्यांच्या सोबत रहाणे, बोलणे, गोष्टी वाटून घेणे आपल्याला मनापासून आवडते त्या नात्याला मैत्रीचे, दोस्तीचे नाते म्हणतात. पण त्रास तेव्हा होतो, जिथे आजही या नात्याला व्यक्तीच्या लैंगिक गुणधर्मावरून एक अस्वच्छ नाते म्हणून गणले जाते. मुलगा मुलाचा चांगला मित्र राहू शकतो. मुलगी मुलीची जीवलग मैत्रीण राहू शकते पण एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांचे जीवलग असणे म्हणजे त्यांच्यात काही तरी शिजतंय्‌ अशीच समजूत असते. 

 
 
भलेही आज महाविद्यालयात, कार्यालयात स्त्री- पुरुष एकत्र काम करत असले किंवा हो स्त्रिया पुरुषांपेक्षा एक पद पुढेही असल्या तरी एक स्त्री आणि पुरुष याचं एक घट्ट मैत्रीचं नातं असू शकते यावर लोकांची संशयास्पद प्रतिक्रिया येते. याचं महत्त्वाचं कारण स्त्री-पुरुष यांच्यामधील भेदभाव नाही तर आपल्या सगळ्यांची मानसिकता आहे की एक तर स्त्री पुरुषाची आई, बहीण, वाहिनी, आत्या, काकू, मावशी आणि या पुढे गेले तर फक्त बायको असू शकते... कारण जरी एखादी मुलगी एखाद्या मुलाची त्यांच्या दोघांच्या लग्नााआधी चांगली मैत्रीण वा तिचा तो मित्र असेन पण लग्न का एकदाचा झालं तर तो तिच्या पती समोर आणि ना ती त्याच्या पत्नीसमोर सहज वागू बोलू शकतात.
 
हा जो असहजपणा आहे, ही विकृत मानसिकता आहे. माझ्या कुठेतरी वाचण्यात आले होते की- स्त्रियांची पुरुषांबद्दल आणि पुरषांची स्त्रियांबदलची मानसिकता तपासायला एक प्रयोग करण्यात आला होता. तो काळ असा होता की, एका स्टॉपवर रात्री उशिराची बस आली, बसमधे एक स्त्री चढली. बसमध्ये ती एकटीच स्त्री होती बाकी जे काही चार-पाच प्रवासी होते ते सगळे पुरुष होते. जेव्हा ती स्त्री बसमधून उतरली आणि तिला उतरल्यावर विचारण्यात आले की तुझा अनुभव कसा होता तर ती म्हणाली- माझ्या मनात सतत भीती होती कारण मी एकटीच स्त्री होते आणि बाकी सगळे पुरुष होते अगदी असंच पुरुषबरोबर पण करण्यात आले. रात्री उशिराच्या बसमध्ये तो चढला आणि बसमध्ये तो एकटाच पुरुष बाकी सगळे चार-पाच प्रवासी स्त्रिया होत्या. तो उतरल्यावर त्यालासुद्धा त्याचा अनुभव विचारण्यात आला तर तो म्हणाला- मला तर एकदम मज्जा आली, मी एकटा राजासारखा होतो आणि बाकी स्त्रिया मला माझ्या राण्यांसारख्या भासत होत्या.
 
हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे. आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता मानतात. पण ती समानता समाजाच्या भरगच्च गर्दी समोर एकांतात कुठेतरी गुदमरलेली असते...