लोकसभेच्या अध्यक्षपदाची उज्ज्वल परंपरा...

    दिनांक :20-Jun-2019
दिल्ली वार्तापत्र  
श्यामकांत जहागीरदार  
 
सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानच्या कोटा मतदारसंघातील खासदार ओम बिर्ला यांची अविरोध निवड झाली. ही सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ओम बिर्ला भाजपाचे खासदार असले, तरी आता लोकसभेचे अध्यक्ष झाल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे नेते झाले आहेत.
 
 
 
 
 
सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवताना सर्व पक्षांच्या सदस्यांना न्याय देण्याची तसेच कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे, ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे आणि निष्पक्ष भावनेतून पार पाडतील, याबद्दल शंका नाही. ओम बिर्ला यांची निवड करताना मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनाच धक्का दिला आहे. अध्यक्षपदासाठी ज्या नावांची चर्चा होती, त्यात बिर्ला यांचे नाव नव्हते. श्रीमती मेनका गांधी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे त्यांची अध्यक्ष म्हणून निवड होईल, अशी चर्चा होती. तसे झाले असते, तर अध्यक्षपदी येणार्‍या त्या तिसर्‍या महिला ठरल्या असत्या. ओम बिर्ला यावेळी दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्या अर्थाने लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांना एकाच कार्यकाळाचा अनुभव आहे. हा अनुभव खूप जास्त नसला तरी अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना काही अडचण येईल, असे वाटत नाही. कारण लोकसभेत विरोधी पक्ष नावालाही उरला नाही, जो काही थोडाफार आहे, तो लोळागोळा झालेला आणि आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला आहे.
 
लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर बिर्ला आता फक्त भाजपाचे सदस्य राहिले नाहीत, तर सभागृहातील सर्व पक्षांचे पालक झाले आहेत. बिर्ला यांची तुलना प्रत्येक वेळी, याआधीच्या लोकसभेच्या अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांच्याशी होणार आहे. सुमित्रा महाजन ज्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या, त्याच म्हणजे सोळाव्या लोकसभेचे बिर्ला सदस्य होते. त्यामुळे महाजन यांनी सभागृहाचे कामकाज कसे चालवले, याचा त्यांना चांगला अनुभव आहे. श्रीमती महाजन हसतमुखाने, सदस्यांना आईच्या मायेने सांभाळून घेत आणि प्रसंगी कठोरही होत सभागृहाचे कामकाज चालवत असत. त्याच मार्गाने बिर्ला यांना आपली वाटचाल करावी लागणार आहे. अध्यक्ष म्हणून आपली छाप सभागृहात पाडावी लागणार आहे. अध्यक्षाला सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्ष यांच्यात सेतूची भूमिका पार पाडावी लागते. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील मतभेद आणि संघर्ष एका मर्यादेपलीकडे जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. सरकारी पक्षाची विधेयके पारित करून घेण्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य मिळवावे लागते, तर दुसरीकडे सरकारकडून विरोधी पक्षांवर अन्याय होणार नाही, त्यांचा आवाज दडपला जाणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागते. त्या अर्थाने अध्यक्षपद हे मोठे आव्हानाचे असते.
 
आपल्या देशातील लोकसभेच्या अध्यक्षपदाची परंपरा अतिशय उज्ज्वल अशी आहे. गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या नावाने दिल्लीत एक सभागृह आहे. मात्र, या सभागृहाच्या बाहेर त्यांच्या नावाची जी पाटी लागली आहे, त्यावरील मावळंणकर यांच्या नावाचा अपभ्रंश पाहिला तर ही व्यक्ती मराठी आहे, यावर विश्वास बसत नाही.
 
लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आतापर्यंत चार मराठीभाषक लोकांना संधी मिळाली आहे. यात गणेश वासुदेव मावळंणकर, मनोहर जोशी, शिवराज पाटील आणि श्रीमती सुमित्रा महाजन यांचा समावेश आहे. सुमित्रा महाजन या मराठीभाषक असल्या आणि त्यांचा जन्मही कोकणातला असला, तरी त्यांची राजकीय कारकीर्द मध्यप्रदेशच्या इंदूर येथील आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव मावळंणकर, मनोहर जोशी आणि शिवराज पाटील हे तिघेच राहतात. मनोहर जोशी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते.
 
आतापर्यंत दोन महिलांना लोकससभेचे अध्यक्षपद भूषवण्याचे भाग्य मिळाले, यात श्रीमती सुमित्रा महाजन आणि मीराकुमार यांचा समावेश आहे. मीराकुमार, माजी उपपंतप्रधान जगजीवनराम यांच्या कन्या होत. त्यामुळे त्यांना राजकीय घराण्याची पार्श्वभूमी होती, मात्र सुमित्रा महाजन यांनी अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.
 
मीराकुमार यांच्यानंतर लगेच सुमित्रा महाजन यांची अध्यक्षपदी निवड झाली. मीराकुमार यांच्याआधी सोमनाथ चटर्जी लोकसभेचे अध्यक्ष होते. सोमनाथ चटर्जी माकपचे नेते होते. मात्र, अध्यक्षपदावर असतानाच पक्षाचा आदेश झिडकारल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्‌टी करण्यात आली. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर सोमनाथ चटर्जी यांची मोठी उपेक्षाही झाली. सोमनाथ चटर्जी यांच्याआधी मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते. जीएमसी बालयोगी यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर मनोहर जोशी अध्यक्ष झाले होते.
 
नीलम संजीव रेड्‌डी दोनदा लोकसभा अध्यक्ष होते. पहिल्यांदा त्यांनी कॉंग्रेसतर्फे, तर दुसर्‍यांदा जनता पक्षातर्फे अध्यक्षपद भूषवले. 17 मार्च 1967 ते 19 जुलै 1969 या काळात रेड्‌डी पहिल्यांदा लोकसभेचे अध्यक्ष झाले. लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ते थेट राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती म्हणून गेले. विशेष म्हणजे एकदा नीलम संजीव रेड्‌डी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. लोकसभेच्या अध्यक्षपदावरून थेट राष्ट्रपती होण्याचा बहुमान रेड्‌डी यांच्यानंतर दुसर्‍यांदा कुणालाच मिळाला नाही. दुसर्‍यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान रेड्‌डी यांच्याव्यतिरिक्त एम. ए. अय्यंगार, गुरुदयालसिंग धिल्लो आणि बलराम जाखड यांना मिळाला. गणेश वासुदेव मावळंणकर आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर अय्यंगार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. दुसर्‍या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची फेरनिवड झाली. त्यांच्यानंतर हुकुमिंसह लोकसभेचे अध्यक्ष झाले.
 
नीलम संजीव रेड्‌डी यांच्या जागेवर उर्वरित कालावधीसाठी धिल्लो यांची चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. पाचव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही नंतर त्यांची फेरनिवड झाली. धिल्लो यांच्यानंतर बळीराम भगत लोकसभेचे अध्यक्ष झाले. नीलम संजीव रेड्‌डी यांच्यानंतर के. एस. हेगडे, बलराम जाखड, रवि रे यांनी लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले.
 
सर्वाधिक काळ लोकसभेचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान बलराम जाखड यांना मिळाला. ते सातव्या आणि आठव्या लोकसभेच्या दोन कार्यकाळात जवळपास नऊ वर्षे अध्यक्ष होते. जाखड यांचा अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ 22 जानेवारी 1980 ते 27 ऑक्टोबर 1984 असा म्हणजे 3 वर्षे 358 दिवसांचा होता, तर दुसरा कार्यकाळ 16 जानेवारी 1985 ते 18 डिसेंबर 1989 असा म्हणजे 4 वर्षे 336 दिवसांचा होता.
 
लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पहिलाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचे भाग्य दोन महिलांनाच लाभले. सुमित्रा महाजन यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून पाच वर्षे 10 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्याखालोखाल मीराकुमार यांनी अध्यक्ष म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. सोमनाथ चटर्जी यांना या विक्रमाची बरोबरी करण्यास फक्त चार दिवस कमी पडले. चटर्जी यांचा लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ 4 वर्षे 361 दिवसांचा होता. लोकसभेचे अध्यक्षपद सर्वाधिक म्हणजे 10 वेळा भूषवण्याचा बहुमान कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांना मिळाला. गणेश वासुदेव मावळणकर, एम. ए. अय्यंगार, हुकुमिंसह, नीलम संजीव रेड्‌डी, गुरुदयालिंसग धिल्लो, बळीराम भगत, बलराम जाखड, शिवराज पाटील, पी. ए. संगमा आणि मीराकुमार हे कॉंग्रेसचे होते.
 
विशेष म्हणजे नीलम संजीव रेड्‌डी यांनी एक़दा कॉंग्रेसचे, तर दुसर्‍यांदा जनता पक्षाचे नेते म्हणून लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले. लोकसभेचे अध्यक्षपद भूषवताना पी. ए. संगमा कॉंग्रेसचे होते. अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसही सोडत शरद पवारांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्याखालोखाल दोनदा हा विक्रम भाजपाच्या नावाने आहे. श्रीमती सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला हे भाजपाचे आहेत. सोमनाथ चटर्जी माकपचे, मनोहर जोशी शिवसेनेचे, जीएमसी बालयोगी तेलगू देसमचे, रवि रे जनता दलाचे, नीलम संजीव रेड्‌डी आणि के. एस. हेगडे जनता पक्षाचे होते. या सर्व अध्यक्षांनी, मग ते आधी कोणत्याही पक्षाचे असो, अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे पार पाडली. या परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी आता ओम बिर्ला यांच्यावर आली आहे.
 
9881717817