उपनिरीक्षक संजय टेमगिरेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

    दिनांक :20-Jun-2019
नागपूर: खुनाच्या गुन्ह्यात भावाला मदत करण्यासाठी एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी अजनीचे पोलिस उपनिरीक्षक संजय टेमगिरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच टेमगिरे हे फरार झाल्याची माहिती आहे.
२१ मे रोजी नवीन बाभुळखेडा, धोबीघाट येथे लग्न समारंभाच्या कार्यक्रमात धक्का लागल्याच्या कारणावरून आशुतोष बाबुलाल वर्मा (२५) याचा खून करण्यात आला होता. मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात तरुणीचा भाऊ देखील जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय टेमगिरे यांच्याकडे होता. दरम्यान, टेमगिरे यांनी चौकशीच्या नावाखाली पीडित तरुणीला रात्री बेरात्री पोलिस ठाण्यात बोलवित होते. त्याचप्रमाणे तिला रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यासमोर थांबवून ठेवत होते. १३ जून रोजी टेमगिरे यांनी पीडित तरुणीला सिनेमाला चल असे म्हटले होते. त्याचप्रमाणे तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर सिनेमाच्या तिकीटा पाठविल्या होत्या. त्याचप्रमाणे वेळी अवेळी ते तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते.
याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी टेमगिरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच संजय शहरातून फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या मूळगावी देखील त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
 
 
 
पारदर्शक कारभाराळा काळीमा
पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे शहर पोलिस दलात पारदर्शक कारभार आणि लोकाभिमूख पोलिसींग करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना संजय टेमगिरेसारखे पोलिस अधिकारी काळिमा फासत आहेत. ९ जून रोजी सीताबर्डी वाहतूक शाखेतील सचिन हांडे या शिपायाला दारू तस्करी करताना वरोरा पोलिसांनी पकडले होते. तत्पुर्वी एका डॉक्टरला १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षक घोडाम आणि दोन कर्मचाèयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाचा तस्कर आबू याच्या संपर्कात असणाèया ४ पोलिस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणांची चर्चा संपत नाही तोच टेमगिरे यांचे प्रकरण चव्हाट्यावर आले.