रेकॉर्डसाठी अ‍ॅव्हेंजर्सचा नवा अवतार

    दिनांक :20-Jun-2019
मार्व्हलचा सर्वात मोठा सुपरहिरोपट Avengers Endgame पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे. हा सुपरहिरोपट येत्या २८ जूनला जगभरात प्रदर्शित केला जाईल अशी माहिती मार्व्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीन फ्रेग यांनी दिली आहे. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेममध्ये इतर मार्व्हल सुपरहिरोपटांप्रमाणे कोणत्याही प्रकारचे पोस्ट क्रेडीट सीन्स नव्हते अशी तक्रार चाहत्यांकडून केली गेली होती. या तक्रारींची मार्व्हल स्टुडिओने गांभीर्याने नोंद घेत पुन्हा एकदा नव्या बदलांसह चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २.७४३ अब्ज अमेरिकी डॉलरची कमाई केली आहे. भारतातही या सुपरहिरोपटाने अनेक मोठ्या बॉलिवूडपटांचा विक्रम मोडून तब्बल १३० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती. यावरूनच अ‍ॅव्हेंजर्सची लोकप्रियता आपल्या ध्यानात येते. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सध्या दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांचा अवतार पहिल्या स्थानावर विराजमान आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल २.७८८ अब्ज अमेरिकी डॉलर्सची कमाई केली होती. Avengers Endgame अवतारच्या तुलनेत फक्त ४५ दशलक्ष डॉलर मागे आहे. याचा विचार करता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यास तो अवतारला मागे टाकून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या स्थानावर येण्याची शक्यता आहे.
आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क, स्पायडरमॅन यांसारख्या तब्बल ३५ सुपरहिरोंनी भरलेला Avengers Endgame हा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा आजवरचा सर्वात मोठा सुपरहिरोपट आहे. मार्व्हलने गेल्या ११ वर्षांत २२ सुपरहिरोपट तयार करून कमी कालावधीत एकाच बॅनरखाली सर्वाधिक चित्रपट तयार करण्याचा विक्रम केला आहे.