भंडारा: पाण्याचे पाईप जळून खाक

    दिनांक :20-Jun-2019
भंडारा नगर परिषदेचे मोठे नुकसान
 
 
भंडारा: शहरातील शास्त्री नगर भागात पाणी पुरवठा करणा-या टाकीखाली ठेवलेले रिकाम्या पीव्हीसी पाईपांना आग लागल्याची घटना आज गुरूवार 20 जून रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे भंडारा नगर परिषदेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शहरातील शास्त्री नगर येथील दसरा मैदानावर नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी टाकी आहे. येथून शास्त्री नगर ते टाकळी पर्यंतच्या परिसरात पाणी पुरवठा होतो. शहरातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने नवीन पीव्हीसी पाईप आणण्यात आले होते. कित्येक महिन्यापासून येथे हे पाईप कच-याप्रमाणे पडून होते. आज दुपारच्या सुमारास त्यांना अचानक आग लागली. येथे कुणीही कर्मचारी नसल्याने आग लागल्याचे त्वरीत लक्षात आले नाही. धूराचे लोळ पाहून नागरिकांना आगीची माहिती झाली. प्रचंड धूराच्या लोळात काही काळ पाण्याची टाकीही दिसेनासी झाली होती. ब-याच वेळाने नगर परिषदेचे अग्नीशमन वाहन पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत पाईप जळून भस्मसात झाले होते. वृत्त लिहेस्तोवर पंचनामा करण्यात आलेला नव्हता.