२६ जूनला वाजणार शाळेची पहिली घंटा

    दिनांक :20-Jun-2019
पुष्प देऊन नवप्रवेशितांचे होणार स्वागत

 
 
 
भंडारा: येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी सर्व शाळांमध्ये नव्याने प्रवेशित होणा-या विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे. जिल्ह्यात 26 जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असून नवप्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
प्रवेशोत्सवाची पुर्वतयारी म्हणून 25 रोजी सर्व क्षेत्रीय अधिका-यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन व प्रवेशपात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. 26 जून ला शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित रहावे याकरिता विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जातील. पुस्तक दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत सर्व बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. इयत्ता पहिलीमध्ये प्रवशित बालकांचा फुले देऊन पदाधिका-यांच्या हस्ते स्वागत करण्यात येईल. वर्षभर शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देवून एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही याची सर्वांना प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष वर्गाध्यापनास प्रारंभ करण्यात येणार आहे.