‘नेटफ्लिक्स’वर या चित्रपटाचा विक्रम

    दिनांक :20-Jun-2019
‘नेटफ्लिक्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नव्या चित्रपटांची, वेब सीरिजची भर पडत असते. एखादा चित्रपट किंवा सीरिज लोकांकडून सर्वाधिक पाहिली गेली असल्यास नेटफ्लिक्स त्याचा आकडा जाहीर करते. आठवड्याभरापूर्वीच ‘मर्डर मिस्ट्री’ हा चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. जेनिफर अॅनिस्टन व अॅडम सँडलर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत विक्रम मोडला आहे. अवघ्या तीन दिवसांत तीन कोटी लोकांनी हा चित्रपट पाहिल्याचं नेटफ्लिक्सने जाहीर केलं आहे.
 
 
‘मर्डर मिस्ट्री’ या नावावरूनच चित्रपटात गूढ, रहस्य वगैरे असेल असं तुम्हाला वाटलं असेल. हे थोड्याफार प्रमाणात बरोबरसुद्धा आहे. पण हत्येचं गूढ उलगडत असतानाच त्यात विनोद, कलाकारांची धमाल मस्तीसुद्धा आहे. पती-पत्नी त्यांच्या लग्नाच्या पंधराव्या वाढदिवशी युरोपला हनिमूनला जातात. तिथे घडणाऱ्या अनपेक्षित घटना, एका जहाजावर श्रीमंत व्यक्तीचा झालेला खून, त्यापाठोपाठ होणारे तीन खून याभोवती चित्रपटाची कथा फिरते. समीक्षकांनी या चित्रपटाला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नसला तरी प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलेला दिसत आहे.
नेटफ्लिक्सवर एखादा चित्रपट किती लोकांनी पाहिला याचा आकडा सहजासहजी जाहीर केला जात नाही. हा आकडा फार मोठा असेल तरच तो नेटफ्लिक्सकडून सांगण्यात येतो. याआधी सँड्रा बुलकची मुख्य भूमिका असलेला ‘बर्ड बॉक्स’ हा चित्रपट पहिल्या चार आठवड्यांत ८ कोटी लोकांनी पाहिल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.