संथ खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव फायदेशीर ठरला : विल्यम्सन

    दिनांक :20-Jun-2019
बर्मिंघम,
येथील संथ खेळपट्टीवर खेळण्याचा मला आणि माझ्या संघाला फायदा झाला, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर बोलताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने व्यक्त केली. त्याने नाबाद शतकी धावा काढून आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे.
 

 
 
दक्षिण आफ्रिकेच्या सहा बाद 241 या धावसंख्येला उत्तर देताना न्यूझीलंडने तीन चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्यप्राप्ती केली. मोठे कठीण आव्हान असलेल्या खेळपट्टीवर कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना विल्यम्सनने 138 चेंडूंमध्ये नऊ चौकार व एक षटकार हाणून 106 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. एवढेच नव्हे तर त्याने मार्टिन गप्टिलसोबत दुसर्‍या गड्यासाठी 60 आणि कोलिन डिग्रॅण्डहोमेसोबत सहाव्या गड्यासाठी 91 धावांची भक्कम भागीदारी केली. कोलिनने आपल्या कर्णधाराला सुरेख साथ देताना 47 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांच्या साह्याने 60 धावा ठोकल्या.
 
मधल्या आणि खालच्या फळीत अशाप्रकारची भागीदारी करणे खर्‍या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरले. आमच्यासाठी अशापरिस्थितीचा अनुभव हा फायदेशीर ठरत असतो, असेही विल्यम्सन म्हणाला. हा तुझा सर्वोत्कृष्ट डाव होता का, असे विचारले असता तो म्हणाला की, मला आपल्या डावाला रँिंकग देणे आवडत नाही. मात्र, मी जेव्हा केव्हा मैदानात उतरतो तेव्हा माझा हा प्रयत्न असतो की आपल्या संघाच्या विजयात आपले भरीव योगदान असावे. या सामन्यात मला माझ्या प्रयत्नात यश मिळाले, याचा आनंद आहे.
 
या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी खुलून फलंदाजी केली नसली तरी याला ग्रॅण्डहोमे अपवाद ठरला. त्याच्या फलंदाजीच्या संदर्भात बोलताना विल्यम्सन म्हणाला की, ग्रॅण्डहोमेसोबतची भागीदारी महत्त्वाची ठरली. कारण, या भागीमुळेच सामन्याला कलाटणी मिळाली. कदाचित त्याने खेळपट्टीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न न करता खुलून फलंदाजी केली आणि त्यात त्याला सकारात्मक बदल घडवून आणता आला.