माही गिल मारहाण प्रकरणी तिघांना अटक

    दिनांक :20-Jun-2019
मुंबई,
अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना बुधवारी संध्याकाळी झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कृष्णा सोनार, सोनू दास व सूरज शर्मा अशा या तिघांची नावं आहेत. या तिघांचा आणखी एक साथीदार रोहित गुप्ता अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 
 
मीरा रोडवरील एका फॅक्टरीत 'फिक्सर' या शोच्या शूटिंग दरम्यान हा प्रकार घडला होता. शूटिंगसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्याही घेण्यात आल्या होत्या. लोकेशन मॅनेजरला पैसेही देण्यात आले होते. तरीही शूटिंगसाठी परवानगी घेतली नसल्याचं सांगत कलाकारांना लाठ्या-काठ्या व रॉडने मारहाण करण्यात आली होती.
 
 
दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. 'सेटवरील सर्वच कलाकारांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण केली. ते आमचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. एखाद्या जनावराला मारतात, तसे ते मारहाण करत होते. असा भयंकर प्रकार मी पहिल्यांदा पाहिला', असं आरोप या व्हिडिओद्वारे अभिनेत्री माही गिलनं केला होता.
दिग्दर्शक इम्पल आहुजा यांनी आज सकाळी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, अभिनेत्री माही गिलला मारहाण झालीच नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.