योगसाधनेमुळे आईची तब्येत सुधारली

    दिनांक :21-Jun-2019
शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळावे यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याची गरज आहे, असा सल्ला अनेक वेळा योगाभ्यासक देतात. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, जे नियमितपणे योग आणि व्यायाम करतात. आज २१ जून म्हणजेच जागतिक योगदिन. २०१५ पासून २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. अक्षय कुमार सुद्धा नेहमी फिटनेस जपणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. योगदिनानिमित्त स्वतःचा प्रवास शेअर करण्याऐवजी त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
 
 
अक्षयने त्याची आई, अरुणा भाटिया यांचा योगासनातील एक फोटो शेअर केला आहे. “मी एक असा फोटो शेअर करत आहे ज्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या आईचे ७५व्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले. त्यानंतर तिने योगसाधनेला सुरुवात केली. आता तिच्या आयुष्यात ‘योग’ हा अविभाज्य भाग झाला आहे. कोणतीही गोष्ट सुरु करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.” असे त्याने म्हटले आहे. सध्या अक्षय रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेसृष्टीत अक्षय कुमार एक शिस्तप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी सायकलिंगपासून योगसाधनेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी अक्षय करत असतो.