पाय चुरणे...

    दिनांक :21-Jun-2019
मी कॉलेजमध्ये (आजोळी) असतानाची गोष्ट. घरातल्या प्रेमळ व्यक्तींपेक्षा मित्र-मैत्रिणी जवळचे वाटण्याचं ते चमत्कारिक वय! मलाही त्या वयात खूप मित्र-मैत्रिणी होते. मुख्य म्हणजे पाच-सहा वेगवेगळे ग्रुप्स होते. साहजिकच कोजागिरी, पहिला पाऊस, सगळ्यांचे वाढदिवस, परीक्षेचा शेवटचा दिवस (आमच्यावेळी हेच स्पेशल डेज असायचे.) अशा दिवशी कुठल्यातरी ग्रुपचा कार्यक्रम असायचा आणि मी घरी नसायचे. एका कोजागिरीला मात्र काहीतरी राडा झाला. आमचा सातार्‍याबाहेरचा ग्रुप आला होता आणि रात्री एका मैत्रिणीच्या घरी जमायचं ठरलं. मी राहात असलेल्या आळीतल्या ग्रुपला हे सांगण्यासाठी मी तडफडत आळीत पोहोचले. तर, ‘‘इतका वेळ कुठे होतीस? आता आम्ही नकोसे झालो का?’’ अशा मुद्यांवर ते मला बोलायलाच लागले. म्हणजे मी जाणीव ठेऊन सांगायला आले, त्याचं काहीच नाही. मला क्रोध आणि शोक या दोन्ही भावना अनावर झाल्या. त्या भरात मी घरीच थांबायचा निर्णय घेऊन उपाशी पोटी झोपून गेले. झोपले म्हणजे काय? डोक्यावरून पांघरूण घेतलं होतं, पण आत धुसफूस चालूच होती.
 

 
 
तासाभरानं माझा धाकटा मामा येऊन माझ्या शेजारी बसला. आज कोजागिरी असून ही घरी कशी? काहीतरी बिनसलेलं दिसतंय्‌. त्यानं आजीला विचारलं. वेडाबाई आहे. सगळ्यांना जीव लावते. तिच्याशी गप्पा मारता मारता तो माझे पाय चेपायला लागला. मी अस्वस्थ झाले. पण झोपले होते ना? काही बोलताही येईना. मामा किती वेळ पाय चेपत होता देव जाणे! (त्याच्या हातात जादू आहे. आजही तो घरातल्या लहान मुलांचे पाय चेपतो तेव्हा मुलं त्याला हटकून अजून म्हणतात.) पायाचे पंजे, तळवे, बोटं, पोटर्‍या.... हळूहळू मन शांत होत गेलं. त्याच्या त्या ममता आणि स्नेह्युक्त स्पर्शानं माझा क्रोध आणि शोक कधी मावळला आणि मी कधी निद्रादेवीच्या कुशीत शिरले ते मला देखील कळलं नाही.
 
शास्त्रात सांगितलेल्या पादसंवाहन म्हणजे पाय चेपणं िंकवा पाय चुर्ण याची महती मी त्या दिवशी ही अशी अनुभवली होती. आपल्याकडे पूर्वी, शरीर आणि मनानं बाहेरून श्रमून बाहेरून आलेल्या कर्त्या पुरुषाचे पाय कुणीतरी चेपून देत असे. पत्नी तर हमखास. (पत्नीचे पाय देखील चुरून मिळत. पण लाजेपायी त्याची वाच्यता होत नसे.) साधीशी प्रेमळ कृती... पण त्यात स्त्री-पुरुष समानता, संगीत मानापमान शिरलं आणि त्यातलं सुखच हरवून गेलं.
 
होय सुखच! पादसंवाहन या उपक्रमाचा सुश्रुताचार्यांनी दिनचर्येत समावेश केला आहे आणि त्यानं सुख निर्मिती होते असं स्पष्ट म्हटलं आहे. हातानं हळूहळू, बलाचा फारसा वापर न करता पायांना तेलाचं मालिश करणं म्हणजे पादसंवाहन! हे असं पादसंवाहन करून घ्यायला आपले लोक परदेशात आणि परदेशातले लोक इथे शेकडो रुपये मोजतात. तेल आणि हाताचा मृदू स्पर्श. म्हणजे स्नेह गुणिले स्नेह= स्नेह वर्ग... अर्थात रोज असा तेलाचा थाटमाट (आणि राडा) जमणं अवघड असतं. पण सुश्रुताचार्य म्हणतात की तेलाशिवाय देखील पादसंवाहन करता येतं. त्यालाच आपण बोली भाषेत पाय चेपणं िंकवा पाय चुरणं म्हणतो.
 
पादसंवाहनाचे शास्त्रात सांगितलेले फायदे आश्चर्यकारक आहेत. पादसंवाहनानं मांस, रक्त आणि त्वचा प्रसन्न होतात. यानं झोप छान लागते. (कधीतरी पंधरा- वीस मिनिटांच्या टीव्हीवर िंकवा मोबाईलवर पाणी सोडून, निद्रानाश झालेल्या घरातल्या आजी/ आजोबांचे पाय चेपून द्यावे. त्यांना झोप लागेल आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील.) पादसंवाहन हे फाजील वाढलेला वात आणि कफ कमी करणारं आहे. अर्थात त्यासाठी ते नियमित करायला हवं.
 
पादसंवाहनाचे दोन महत्त्वाचे फायदे. पहिला म्हणजे ते प्रीतिकर आहे. म्हणजे दोन जिवांमधला परस्पर स्नेह वाढवणारं आहे. वडील- मुलगा, आई- मुलगी, आजी/आजोबा- नातवंड, पती- पत्नी यांच्या नात्यातला स्नेह या छोट्याशा कृतीनं वाढतो. (हे मानसशास्त्र आहे. हे भौतिक, रसायन, जीवशास्त्र यांच्या आधारे सिद्ध करून मागणार्‍या विज्ञानांध व्यक्तीनं कुणाहीकडून पाय चेपून घेऊ नयेत.) शास्त्रात सांगितलेला याचा दुसरा फायदा म्हणजे हे वृष्य आहे. म्हणजे प्रजोत्पादन आणि नवनिर्मिती करणार्‍या शरीराधातूला पोषक आहे. आज शहरामध्ये अपत्यप्राप्तीसाठी अनेक जोडपी उपचार घेताना आढळतात. त्यातील काही उपचार तर प्रचंड वेदनादायक असतात. अशा जोडप्यांनी आपल्या प्रयत्नात भर म्हणून पादसंवाहन करायला हरकत नाही. तशीही या नात्यात स्नेह निर्माण करायची गरज आज वाढली आहे.
मी मात्र त्या लक्ष्मीची अत्यंत कृतज्ञ आहे.....
मी तो पापी अपार, तरी कृपा करी नारायण।
त्याच्या हृदयी स्नेहाची खाण, कारण लक्ष्मी चुरते चरण।।
• वैद्य सुचित्रा कुळकर्णी
चिकित्सक, लेखिका, व्याख्याता, समुपदेशक