शिवानी पुन्हा दिसणार ‘बिग बॉस’मध्ये

    दिनांक :21-Jun-2019
सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात बऱ्याच रंगतदार गोष्टी घडत आहे. नुकत्याच झालेल्या ‘वीकेंडचा वार’ एपिसोडमध्ये अनपेक्षित गोष्टी घडल्या. यंदाच्या सिझनमध्ये सर्वांत जास्त चर्चा ज्या स्पर्धकाची झाली, तिनेच बिग बॉसचं घर सोडलं. शिवानी सुर्वेनं हा शो मध्येच सोडला. घरात प्रवेश केल्यापासूनच शिवानी चर्चेत राहिली. तिला खूप फॅन फॉलोइंगसुद्धा आहे.
 
 
आरोग्याची कारणे देत शिवाने बिग बॉसचं घर सोडलं आणि त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांना मुलाखती देणंसुद्धा टाळलं. मात्र ती घरात पुन्हा एकदा प्रवेश करू शकते. याचे संकेत तिने स्वत: दिले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘माझी तब्येत आता सुधारतेय पण मी पूर्णपणे बरी नाही. शोमधील माझा अनुभव चांगला होता. संपूर्ण टीम माझ्या मदतीला सदैव तयार होती. मला जर पुन्हा संधी मिळाली तर मी नक्की बिग बॉसच्या घरात जाईन पण माझी तब्येत पूर्णपणे बरी झाल्यावरच मी हा निर्णय घेईन.’
आरोग्याविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, ‘मला क्लॉस्ट्रोफोबियाचा (बंदिस्त ठिकाणी राहण्याची भीती वाटणे) त्रास आहे. त्यामुळे मी हा प्रवास पूर्ण करू शकले नाही. नाहीतर या पर्वाची विजेती मीच असती हा माझा ठाम विश्वास आहे.’
१५ जून रोजी शिवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि तिच्या जागी हिना पांचाळने घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली. येत्या काळात बिग बॉस शिवानीला पुन्हा एकदा संधी देणार का व ती संधी शिवानी स्वीकारणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.