इंदिरा संत यांच्या कवितेमधील स्त्री...

    दिनांक :21-Jun-2019
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे का पावा मंजूळ
मावळतीवर चंद्र केशरी पहाटवारा भवती भनभन
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून अपुले तनमन
विश्वच अवघे ओठ लावून कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे... हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव...
राधा, रुक्मिणी, सत्यभामा, अगदी मीरेपर्यंत श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या स्त्रियांवर आजवर अनेक साहित्यिकांनी, कवींनी भरपूर लेखन केले आहे. कृष्णसखी होण्यासाठी िंकवा आपल्या साजनामध्ये कृष्ण शोधणार्‍या या कधी स्वतःला राधा, मीरा, तर कधी रुक्मिणी अशी नावे घेतात. मात्र, इंदिरा संत यांनी कृष्णजीवनातील सातत्याने दुर्लक्षित राहिलेले एक स्त्री पात्र कुब्जा हिला आपल्या कवितेमध्ये फक्त स्थानच दिले नाही, तर आपल्या कवितेमधून हे पात्र सजीव केले आहे. जेव्हा राधेसह सर्व गोकुळ निजलेले असते अशा वेळी कृष्णाच्या बासरीचा मंजूळ आवाज फक्त कुब्जा समजून घेते. अर्ध्या पाण्यामध्ये उभी असलेली कुब्जा तो मुरलीरव पिऊन टाकते, तो फक्त तिला एकटीलाच कामी येतो असे नाही, तर तिने पिलेला मुरलीचा तो आवाज अगदी सर्वसामान्य आणि प्रसंगी कुरूप असणार्‍या स्त्रियापर्यंत पुरतो आणि त्यांच्या वाट्यालाही निस्सीम प्रेम येते. खर्‍या अर्थाने एका कुरूप आणि गरीब पण मनाने अतिशय निर्मळ अशा स्त्रीची भावस्पंदनं इंदिरा संत यांनी या कवितेमधून मांडले आहेत. इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकात इंडी या गावी झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. इंदिरा संत यांचे शेला, मेंदी, मृगजळ, रंग बावरी, गर्भरेशीम असे कवितासंग्रह वाचकांच्या कायम स्मरणात आहेत. साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजळपणा आणि एक अखंड संवादलय ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये. इंदिरा संत यांच्या कवितांमधली स्त्री कधी असंयमी, समर्पिता, प्रियकराभोवती रुंजी घालणारी, फुलांचा गजरा करून साजनाची वाट पाहणारी आहे. पूर्णत्व आणि गांभीर्य म्हणजे पुरुष आणि चंचलता म्हणजे स्त्री. ही स्त्री पन्नास-साठच्या दशकातील स्त्री-प्रतिमेला साजेशीच होती. पण, काळानुसार ही प्रतिमा बदलत जाते. नंतरच्या काळामध्ये व्यवस्थेनुसार बदललेल्या स्त्री जीवनाला समजून घेण्याचा आणि मध्यमवर्गीय स्त्रीचे दुःख शब्दांत पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विविध परिस्थितीतून आलेल्या व शिक्षकीपेशा पत्करलेल्या स्त्रियांची रेखाटने येतात. ‘कुटुंबातील नीटस पोर’मध्ये, पैशासाठी नोकरी करणार्‍या स्त्रीचे वर्णन येते, आता नोकरी ही पैशासाठीच केली जाते हे सर्वश्रुत असले, तरी कधीकधी मनाची कुचंबणा करून मनाविरुद्ध नोकरी करण्याची वेळ स्त्रियांवर येते. आखीवरेखीव आयुष्यात सर्व तडजोडी करून संसारात चक्राचा तोल सांभाळताना अचानक तोल जातो, स्त्रीचं घरातलं दुय्यम, दुर्लक्षित स्थान, आयुष्यातला कंटाळवाणेपणा आणि घरकामाचं तेच तेचपण कवितेत व्यक्त होतं.
 
 
 
मी म्हणजे केरवारा, स्वैपाकपाणी।
मी म्हणजे आवकजावक बिलेपावत्या
मी म्हणजेे बौद्धिकाची रतीब-गाळणी।
मी म्हणजे हेच काही चैतन्याची चमक नाही।।
दगडाच्या मूर्तीला सजीवत्व बहाल केले जात नाही. स्त्रीला दिलेली चालत्याबोलत्या पाषाणाची उपमा संसारातलं तिचं दुय्यम स्थान पुरेशा समर्थपणे व्यक्त करते. घरासाठी कष्ट करणारी, खस्ता खाणारी, नोकरी करणारी, पैसे कमावणारी, घर सांभाळणारी लक्ष्मी ही घरासाठी आयुष्य वेचताना स्वतःचं सारं काही गमावून बसते, मात्र त्यातही तिला समाधान असतं. याचं उपरोधिक चित्र मध्यमवर्गीय गार्गी या कवितेतील शिजवणारी तीच- शिजणारी तीच, या शब्दांमधून त्या करतात. साधारणतः सर्वसामान्य स्वप्न काय असेल, तर त्याचे उत्तर अगदी साध्या शब्दामध्ये इंदिरा संत यांच्या कवितेमधून मिळते. त्या म्हणतात,
तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे. गप्पागोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.
पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली आणि मग कधी झोप लागलीच नाही.
पण, जेव्हा हे स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा तिला कधीच झोप लागत नाही, असा शेवट करत स्त्रियांच्या अस्वस्थतेचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्नसुद्धा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेमधून केला आहे. अगदी साधे आणि सरळ असे जीवन तिला हवे असते, मात्र कधीकधी तिला तेही मिळत नाही. इंदिरा संत यांच्या कवितेमधून खर्‍या अर्थाने मध्यमवर्गीय स्त्रियांचे दुःख अधोरेखित झाले आहे, असे त्यांच्या कविता वाचताना जाणवते. नको नको रे पावसा असा िंधगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली;
आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझे नेसूचे जुनेर, नको टाकू भिजवून;
किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरई माझा सखा त्याला माघारी आण ना...
आतुरतेने पावसाची वाट पाहणार्‍या जगाच्या विरुद्ध आपल्या परिस्थितीमुळे पावसाला येऊ नको असे सांगणारी इंदिरा संत यांच्या कवितेतील स्त्री विलक्षण विलोभनीय आहे. तिच्या अंगावरील वस्त्र एकमेव असून ते जुनेच आहे. ते भिजू नये अशी इच्छा ती पावसाजवळ बोलून दाखवते. यातून तिचे दारिद्र्‌‌‌य तर अधोरेखित होतेच, शिवाय पती घरी नसल्यामुळे तो घरी येईपर्यंत पाऊस थांबला पाहिजे, अशा भावनेतून तिला पतीविषयी असलेली काळजी वाचकांच्या लक्षात येते. इंदिरा संत यांच्या कवितेतील स्त्री सोशीकच आहे. ती पावसाला आपण किती सोसले हेसुद्धा सांगते. स्त्रीचे दुःख हे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे असते. मुलांचे बालपण सजवणारी आई, मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा एक वेगळ्याच दुःखाला सामोरे जाते.
दिसामाशी वाढताना घर झाले हे लहान;
पालवीत पंख नवे गेली त्याच दारातून!
सांज टळली तरीही दार लावावे वाटेना,
वळेल का कुणी मागे?डोळा वाटुली संपेना...
संपावया हवी वाट, लावावया हवा दिवा;
पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा!
या विलक्षण आगळ्यावेगळ्या कवितेमध्ये मुले मोठी होत जाताना त्यांच्यासाठी घर लहान होते, मोठे विश्व व्यापण्यासाठी त्यांच्या पंखामध्ये बळ येते, मग ती मुले घर सोडून निघून जातात. ती जात असताना घरातील आई मात्र मुले वापस वळतील, घराकडे परत होतील, अशा आशेने संध्याकाळ झाली तरीही दार लावत नाही. मात्र, शेवटी ती कंटाळते आणि वाट पाहणे थांबवले पाहिजे, दिवा लावला पाहिजे आणि जगण्यासाठी तवासुद्धा चुलीवर ठेवला पाहिजे, अशी मनाची समजूत घालते. अशा वेळी तिच्या मनाची तगमग अतिशय अस्वस्थ करून जाते. आजही घराघरांमध्ये लेकराची वाट पाहणारी आई उभी असते, यात शंका नाही. मात्र, याच आईने कधीकाळी या मुलांसाठी किती खस्ता खाल्ल्या हेसुद्धा इंदिरा संत यांच्या कवितांमधून आपल्याला वाचायला मिळते. जसे, नियतीचे देणे या कवितेमध्ये त्या म्हणतात, बाळाच्या वाढदिवशी त्याच्या आवडीचे विमान घेण्यासाठी, फक्त तीन रुपये... तेही बाजूला काढता येत नाहीत. हा रिकाम्या ओंजळीचा गुदमरून टाकणारा ताण सोसला आहे... अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये मुलांना आनंद देणार्‍या मातेचे आणि प्रसंगी लेकरांना छोटे छोटे आनंद देतानाही तिच्या मनाचा कोंडमारा होतो, अशा परिस्थितीतील स्त्रियांचे दुःख इंदिरा संत यांनी मांडले आहे. तर कधी वर कोर्‍या आभाळाची भट्‌टी तापली तापली, खाली लेकराची माय वारा पदराने घाली, अशा ओळींमधून तापलेल्या उन्हामध्ये लेकरांना वारा घालणारी माय त्या कवितेमधून सजीव करतात. नातेसंबंधांचा सोस आणि त्यातील उणीदुणी काढण्याची वृत्ती स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. हाच धागा इंदिरा संत यांनी मऊ रेशमाची घडी या कवितेमध्ये नेमकेपणाने टिपला असून, बहिणीला ओवाळणी दिल्यावर बहिणीच्या वहिनीने भावाचा केलेला अपमान त्यामुळे कानकोंडा असलेला भाऊ, त्यातूनच दूर झालेले नाते इत्यादी गोष्टी सांगताना इंदिरा संत म्हणतात, किती दिवाळ्या येती जाती, भाऊबीज नाही होत. भावाची आठवण मुकी झाली बासनात... ओवाळणीवरून बहीण-भावाचे दुरावलेले नाते कित्येक वर्षांपासून दुरावलेले राहते, याची खंत कवयित्रीच्या मनामध्ये घर करून आहे, असे आपल्याला जाणवते. त्याच जाणिवेतून चार चौकाचे माहेर अशा कवितेची निर्मिती झाल्याचे दिसून येते.
लेकराला कल्पवृक्ष सुखदुःखाला मांडव।
अशा माहेराला आज आसुसला जीव।।
या शब्दांतून माहेराबद्दलची अत्याधिक ओढ दिसून येते.
उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता-उतरता झाला पदर वारा वारा...
झोक्यावर िंहदोळे आकाशाचे स्वप्न पाहणार्‍या स्त्रीला जितके अप्रूप आभाळाचे असते तितकीच ओढ मातीची असते, या दोन्ही गोष्टी इंदिरा संत यांनी तितक्याच समर्थपणे मांडल्या आहेत. कधी झोका आकाशाला बांधला, असे कवयित्री सहजतेने म्हणतात, रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन. आपण मातीतून आलो आहोत आणि आपली मातीच होणार आहे, ही जाणीव ठेवून कवयित्री
व्यक्त होतात. त्याचबरोबर सांगावा या कवितेमध्ये आपला देह म्हणजे मातीचे घर आहे, अशी विलक्षण कल्पना करून दक्षिणेकडून येणारा सांगावा म्हणजेच मृत्यूचा सांगावा, अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्या म्हणतात,
दक्षिणेच्या झंझावाता,
कधी येणार धावत
माझे मातीचे हे घर
कधी घेणार मिठीत?
अशा रीतीने मृत्यूचे स्वागत हसतमुखाने करणार्‍या स्त्रीच्या मनोभूमिकेतून इंदिरा संत व्यक्त होत जातात.
नांदत्या घरी निघून जाणार्‍या, लाडक्या माहेरवाशिणीसारख्या एक एक करत गोष्टी हातातून निसटत गेल्या...
आपल्या आपल्या शब्दांच्या बांधणीसकट...
आयुष्य जगत असताना आपण ज्या गोष्टीची वाट पाहतो त्या गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात आणि एक अधुरेपण जीवनाला व्यापून टाकते, जणू घरात नांदणार्‍या लाडक्या लेकी सासरी निघून जाव्यात आणि घर अबोल होऊन जावे, अशी परिस्थिती निर्माण होते. घरामधून लाडकी लेक निघून गेल्यावर ज्याप्रमाणे घरातील इतर सर्वांचे शब्द गोठून जातात, त्याचप्रमाणे आपल्या हातातील परिस्थिती आवाक्याबाहेर गेली, िंकवा हवे ते लांब लांब केले, शब्दही सुचत नाहीत, असे इंदिरा संत म्हणतात. जीवनामधून निसटून गेलेल्या क्षणांना माहेरवाशिणीचा दर्जा देत इंदिरा संत यांनी खूप सुंदर अशी स्त्रीसुलभ रचना आणि त्याच रचनेमधील विचार वाचकांना दिला आहे. घरामध्ये स्त्री कशी असते, याबाबत तिचा अस्तित्वविचार मांडताना इंदिरा संत यांनी फार आगळेवेगळे शब्द आणि कल्पना शब्दांकित केलेली आहे. डािंळबाच्या कवितेमध्ये त्या म्हणतात,
घर कसे?
घाटदार रसरशीत डािंळबासारखे
घरातील माणसे कशी?
डािंळबातील रसाळ रंगदार दाण्यासारखी...
अशा पद्धतीने घराचे, घरातील माणसाचे सुंदर वर्णन त्या करतात, नंतर त्यांचा मोर्चा वळतो त्या घरातील स्त्रीकडे. स्वतः स्त्री असल्यामुळे त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी म्हणजेच स्त्री, असा विचार करून पुढे ज्या पद्धतीने व्यक्त होतात त्या व्यक्त होण्यातून आजपर्यंत अव्यक्त असलेल्या समस्त स्त्री जातीचे दुःख िंकवा मनोव्यथा त्यांनी सजीव करून मांडली आहे, डािंळब या कवितेत त्या म्हणतात,
मी कशी?
डािंळबातील बी सारखी
सर्वात सामावलेली. सर्वातून वेगळी.
अलिप्त, निर्भर,
अलिशान सिनेमागृहात बसल्यासारखी.
स्त्री नेमकी अशीच असते, फळातील बीप्रमाणे सर्वात सामावलेली असते, मात्र फळाचा विचार करता ती फळाहून वेगळी असते, घरातील स्त्रीवाचून सर्वांचे अडते, मात्र वेळ आली तर तिचे अस्तित्वसुद्धा वेगळे पडते. सर्वांपासून अलिप्त असते, तिच्यावर सर्व निर्भर असतात, ती स्वतः मात्र कुणावरच अवलंबून नसते. असे असले तरी ही व्यवस्था तिला एकाकी ठेवण्यात प्रयत्नशील असते. ही व्यथा जास्तीत जास्त मध्यमवर्गीय स्त्रियांच्या वाट्याला जास्त येत असते. मात्र, या सर्वांची जाणीव असूनही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत असते. कुटुंबातील स्त्रीची व्यथा व्यक्त करत असताना कधीकधी दुर्दैवामुळे एकाकी जीवन जगावे लागणार्‍या स्त्रियांबद्दल इंदिरा संत यांनी लेखन केले आहे.
एकटी चालताना आले वादळ रोंरावत,
पालापाचोळा झाला जीव मुकी जखम काळजात...
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एकाकी स्त्रीचा प्रवास किती कठीण आहे, हे नेमकेपणाने इंदिरा संत यांनी वरील दोन ओळीत जाणवून दिले आहे. या एकटेपणाच्या प्रवासामध्ये आपल्या प्रियकराला, पतीला िंकवा साथीदाराला विसरण्यासाठी ही स्त्री वेगवेगळ्या ठिकाणी आपले मन रमवत असते, त्यातूनच एखादी सुंदर कविता जन्माला येते, ती इंदिरा संत यांच्या स्त्रीसुलभ भावकल्लोेळातून,
तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते; आकांताने घेता दान
पटालाही घेरी येते! असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत... कट्टीत!
अशा रीतीने आपल्या कवितांमधून सातत्याने स्त्रीमनोदशेचा परिपाक समाजापुढे मांडत इंदिरा संत यांनी मध्यमवर्गीय स्त्रीच्या दुःखाकडे एका वेगळ्या नजरेमधून पाहात त्याला नेमकी मोकळी वाट करून दिली आहे. खूप सहज आणि साध्या शब्दांतून त्यांनी स्त्रीचे जीवन, दुःख, जाणिवा इत्यादी टिपल्या आहेत. अगदी साध्यसाध्या नेहमी दिसणारे प्रसंगही इंदिरा संत यांच्या कवितेचे अविभाज्य भाग बनून जात आणि त्यातूनही स्त्रियांची जीवनविषयक दृष्टी आणि तत्त्वज्ञान समोर येते.
ग्लास उचलून ओठाला लावला तर ती
पाणपाखरें चोचीं वर करून किलबिलली,
उगीच... उगीच!
पिऊं की हसूं करतां ठसका लागला,
ग्लासातून निसटताना एक खडीसाखरी पाणपाखरू
किलबिलले, उगीच... उगीच... ठसका लागताना हसणार्‍या खडीसाखर यासारख्या पाणपाखराइतके स्त्रीचे जीवन तरल, निर्मळ आणि प्रसन्न असते. फक्त ते टिपण्याचा, ते पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असला पाहिजे. ती निरागस काव्यवृत्ती इंदिरा संत यांच्यामध्ये ठासून भरलेली होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील स्त्री सातत्याने मध्यमवर्गीय चौकटीत घुसमटत असलेली, दुःखाचे वर्णन करत असत, तरी कधी सामाजिक चौकट तोडत नाही. कुठेही बेधुंद होत नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याचा सारासार विचार करा, स्वच्छंदी होऊन त्यांच्या कवितेतील स्त्री कुठेही बेजबाबदार वर्तन करताना दिसत नाही. तर ती मध्यमवर्गीय स्त्रीप्रमाणेच आखीव-रेखीव चौकटीमध्ये स्वतःचे विश्व मर्यादित करून त्या चौकटीचे पालन करते. ही मध्यमवर्गीय लक्ष्मणरेखा तिने स्वतःच स्वतःभोवती आखलेली आहे, त्यामुळे तिचे पालन कसे करावे याचे तिला भान आहे. यामुळेच कदाचित मध्यमवर्गीय, नोकरदार, एकाकी अशा सर्व स्त्री भूमिका पार पडूनही त्यांच्या मनाची सर्व दारे कवितेच्या स्वागतासाठी सज्ज असून निर्मळ निर्झर याप्रमाणे त्यांचे शब्द साकार झाले आहेत.
 
किरण डोंगरदिवे 
7588565576