एनएसजी गटासाठी भारताच्या उमेदवारीचा विचार नाही

    दिनांक :21-Jun-2019
- चीनची पुन्हा ताठर भूमिका
बीजिंग,
भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याने, सर्वांत शक्तिशाली अशा एनएसजी अर्थात्‌ अणुपुरवठादार देशांच्या गटात भारताला सहभागी करून घेण्याच्या मुद्यावर एनएसजीच्या पुढील बैठकीत कुठलीही चर्चा करण्यात येणार नाही, अशी ताठर भूमिका चीनने पुन्हा एकदा घेतली आहे.
 
 
 
या गटात भारताला सदस्यत्व देण्यासाठी किती काळ लागेल, याबाबत आम्ही आता काहीच सांगू शकत नाही. सर्व सदस्य देशांचे एकमत झाल्यानंतरच पुढे पाऊल उचलण्यात येईल, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
48 सदस्यीय एनएसजी गटाचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी भारताने मे 2016 मध्ये अर्ज केला होता. जागतिक अणुव्यवसायाचे नियंत्रण याच गटातर्फे करण्यात येते. त्यानंतर पाकिस्ताननेही या गटाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. या दोन्ही देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
 
एनएसजीमध्ये भारताला प्रवेश देण्याच्या मुद्यावर चीनच्या भूमिकेत काही बदल झाला काय, असे पत्रकारांनी विचारले असता, कांग म्हणाले की, अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणार्‍या देशांचा आम्ही सध्या कुठलाही विचार करणार नाही. भारतही यात वर्गवारीत येतो.