अमितकुमारची आई- रुमा गुहा...

    दिनांक :21-Jun-2019
किशोरकुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीतले एक अनोखे पर्व आहे. खास लकब असलेला हा गायक हरहुन्नरी कलावंत होताच, पण एक अवलिया होता. कॉफी प्यायला नरमुंडाच्या आकारातला मग, इथून अनेक अशा तर्‍हेवाईट कथा त्यांच्या नावाभोवती गुंफल्या आहेत. त्यातच त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया हादेखील चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी मधुबालापासून योगिता बालीपर्यंत त्यांच्या तीन-चार पत्नींची चर्चा होत राहिली आहे. या सार्‍याच बायका अडचणीत असताना किशोरकुमार यांनी त्यांना आधार देण्यासाठीच त्यांच्याशी विवाह केले होते, हे मात्र नक्की!
 
 
 
या सार्‍यांना त्यांची पहिली पत्नी, गायक अमितकुमारची आई विस्मरणात जाते. दिवंगत गायक किशोरकुमार यांची प्रथम पत्नी आणि गायक अमितकुमार यांची आई, रुमा गुहा-ठाकुरता यांचे गेल्या पंधरवड्यात निधन झाले. त्याची फारशी चर्चा झाली नाही, कारण त्या इकडे मुंबईत राहतही नव्हत्या अन्‌ या गुणी अभिनेत्री, गायिकेचे क्षेत्रही प्रारंभीचा काळ सोडला तर मुंबई हे नव्हतेच. त्या बंगाली कलाक्षेत्रातच वावरत राहिल्या. त्यामुळे 5 जूनला त्या गेल्या तेव्हा बंगाली कलाक्षेत्रात दुखवटा पसरला होता.
रुमा घोष- रुमा गांगुली आणि पुढे रुमा गुहा-ठाकुरता असा त्यांचा कौटुंबिक प्रवास होता. त्यांचा खरा संसार कलेशीच होता. गायिका, अभिनेत्री आणि संगीतक्षेत्रातील संघटक म्हणून त्यांनी केलेले काम अनेकांच्या आठवणीत आजही ताजे आहे.
त्या गेल्या तेव्हा बॉलिवूडमध्ये त्यांच्या पिढीचे त्यांना ओळखणारे कुणीच नसल्याने इकडे दुखवटा पाळला जाण्याचे काही कारण नव्हते. त्यांचे पहिले नायक युसूफ खान उपाख्य दिलीपकुमार हेच काय ते सध्या आहेत; पण त्यांचीही प्रकृती गेली दोन वर्षे नाजूकच आहे.
रुमा यांचा जन्म कोलकात्यात झाला. गोड गळ्याची गायिका असलेल्या या गुणी अभिनेत्रीचा मोठ्या पडद्यावरचा प्रवास बॉलिवूडपासून झाला. 1944 ला आलेला ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार यांचाही हाच पहिला चित्रपट... तो त्यांच्याच नावाने ओळखला जातो. त्यात रुमा नावाची कुणी नायिका होती, हेही अनेकांना आठवत नाही. कारण रुमा यांना िंहदी चित्रपटसृष्टीत हवे तसे यश मिळाले नाही. एक मात्र झाले की, किशोरकुमार नावाच्या अष्टपैलू कलंदर कलावंताशी त्यांचे जुळले आणि मग या दोघांचा विवाह झाला. ते साल होते 1951. एकाच वर्षात, 1952 साली अमितकुमार यांचा जन्म झाला. किशोरकुमार यांच्याशी त्यांचे फार पटले नाही अन्‌ 1958 मध्ये त्या विभक्त झाल्या. कोलकात्याला गेल्या अन्‌ त्यांचा विवाह अरूप गुहा- ठाकुरता यांच्याशी झाला. कोलकात्यात जाऊन रुमा यांनी बांगला चित्रपटसृष्टीवर लक्ष केंद्रित केले. ‘गंगा आणि पर्सनल असिस्टंट’ हा त्यांचा बंगाली चित्रपट 1959 साली आला. नंतर त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांतून कामे केली. हलकेफुलके कौटुंबिक चित्रपट ही त्यांची ओळख होती.
त्यांचा चेहरा खास बंगाली पारंपरिक गोडवा असलेला. त्यामुळे त्या बंगाली चित्रपटांत विधवेपासून सामान्य गृहिणी ते उद्योगिनी- कंपनीची मालकीण अशा कुठल्याही भूमिकेत चपखल बसायच्या. सत्यजित राय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबतही त्यांनी काम केले. अभिजान (1962) आणि गणशत्रू (1989) हे सत्यजीतदांचे चित्रपट रुमा यांच्या खात्यात आहेत.
समांतर चित्रपटांतही त्यांनी काम केले. मीरा नायर यांचा 2006 साली आलेला ‘नेमसेक’ या इंग्रजी चित्रपटातील त्यांची आजीची भूमिका अखेरची ठरली. त्या मुळात गायिका असल्याने त्यांनी पार्श्वगायनही केले. त्या क्षेत्रात त्यांनी संघटनात्मकही काम केले. ‘कोलकाता यूथ कॉयर’ या संगीतसमूहाची स्थापनाही त्यांनी केली. गायकांच्या दोनेक पिढ्या त्यांनी या समूहातून घडविल्या. त्यांचे दीर्घकाळ स्मरणात राहील असे काम म्हणजे त्यांचे संगीतक्षेत्रातले संघटन. कलाक्षेत्राला त्याचा लाभच होत राहणार आहे. अभिनयात त्यांना एक राष्ट्रीय पुरस्कार (चित्रपट- निर्जन सैकाते, 1963) मिळाला होता. किशोरकुमार यांची पत्नी म्हणून िंहदी चित्रपट रसिकांना त्या ज्ञात होत्या.