अभय गरजते, बाय माझी हेरखाते...

    दिनांक :21-Jun-2019
धोंडी धोंडी पानी दे
दायदाना पिकू दे
अधलीभर जवारी छटाकभर मिरच्या
शेरभर दाय मिळू दे
औंदा लय पीक यिऊ दे...

 
उन्हानं तापलेल्या या धरतीवर पावसाचं पाणी पडावं, एवढं तेवढं नव्हे तर मोप पीक येण्याइतकं पडावं, ही आस असते शेतकर्‍याच्या मनात. तर शहरातल्या माणसाला वाटतं की,
गडाड ढगांचे, कडाड विजांचे
भांडण एकदा हवेच होते...
आभाळात काळेशार ढग कधी दाटून येतात नि ते आकाशीच्या विजेशी मस्ती करत कानठळ्या बसविणारा गडगडाट कधी करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. ती असते त्याच्या येण्याची वर्दी! तो? हो तोच... पाऊस! नवचैतन्य प्रदान करणारा पाऊस! त्याची वाट बघताना जिवाची तगमग होत असते. ही तगमग, ही जीवघेणी प्रतीक्षा जशी नागर व ग्रामीण साहित्यात उत्कटतेनं दिसते तशीच ती शेतीशिवाराचं, घरावाड्याचं, पाहुण्यासोयर्‍यांचं, सणावाराचं वर्णन करणार्‍या लोकसाहित्यातही उमटलेली आढळते.
पड पड तो मेघराजा
जसा मोतीयाच्या धारा
गायी वासराला नवा चारा
पड पड पावसा
जसा मोत्याचा शिरवा
मळा सख्याचा हिरवा
ही संपन्नतेची आस घेऊन माय माउली ओव्यांच्या लडी गुंफत असते. तिचं आणि पावसाचं नातं हे इतर कुणाहीपेक्षा वेगळं असतं. या पडणार्‍या पाण्यावर तिचा संसार अवलंबून असतो. तिला काळजी त्याची असते. जशी,
पड पड पावसा इजबाईचा तेलतवा
धरणीमाता बोलं कवा येशील माझ्या गावा...
धरणी मातेचा जो प्रश्न तोच तिचाही प्रश्न आहे. गावाकडं येणारा, धो धो बरसणारा हा पाऊस तापलेल्या धरणीला तृप्त करणार असतोच, पण हिच्या जिवाची काहिली थांबविणारा असतो. ती अस्वस्थता केवळ उष्णतेची नसते, किंवा येणार्‍या थंडाव्याची सुखझुळूक नसते. तर ती वाट असते, सार्‍या संसाराला वैभवाचं दान देणार्‍या वर्षाराणीची! कारण,
आईवाचून माहेर, नवर्‍यावाचून सासर
पावसावाचून रान, कसं दिसतं भेसूर
पावसावाचून, काय करावं जमिनीला
भरतारावाचून, सुख नाही जिवाला...
हे ती जाणून असते. तेवढ्यासाठी तर गरजत्या-बरसत्या बरसातीआधीच्या या मोसमात तिला कारभार्‍यासंगं शेतात धावायचं असतं. काड्याफणं वेचायची असतात. काटीकुटी काढून वावर साफ करायचं असतं. ज्या निगुतीनं घरातल्या जमिनीवरून तिचा हात मायेनं फिरत असतो, तशाच ममतेनं शेतातल्या मातीवर बोटं उमटवत काश्या वेचून धुर्‍यावर फेकायच्या असतात. धुर्‍याचे बांधबंधारे सफा करून घ्यायचे असतात.
अभाय गरजते पाटील हरखते
कायी माती बाई न्हाऊन धुवून बसते...
वळिवाचा पाऊस पडतो. मातीत कुठे कुठे दबा धरून बसलेलं तण तोंड वर काढतं. ते उपटून काढावं लागतं. पुरेशा पावसाची वाट पाहताना ‘जांभूयवाही’ जोर धरते. कारभारी बांधाच्या नालेमुतर्‍या बुझवण्यात नि झाडांच्या अस्ताव्यस्त फांद्या छाटण्यात गर्क होतात. पावसाची चाहूल लागताच शेतात शेणखत पसरवायला सुरुवात होते.
सुतार मेटावरी, कशाची गर्दी झाली
मेघराजानं वर्दी देल्ली...
पेरणीअगोदर सुताराच्या मेटावर एकच गर्दी होते. कारण कुणाच्या तिफणी, कुणाचे जू, कुणाची औत तर कुणाचं आणखी काही बरोबर करून घ्यायचे असतात. ग्रामसंस्कृतीत असा समज आहे की, सुताराचं मेट हे तिफणीचं माहेर आणि शेत हे तिचं सासर!
सुताराचं मेट, तिफणीबाईचं माहेयार
हावशा माहा बंधू, झालं मुराळी तयापार...
शेतात दारात ही लगबग सुरू असताना, घराचं छप्पर- गुरांचं वैरण, चुलीवर पेटवायला पर्‍हाट्या-तुराट्या जमा करणं, अशी तिची समांतर कामाची धांदल सुरू असते. आता पाऊस बरसतो.
पान्या पावसाचं अभाय आलं कावंकिट
उल्हसली धरतरी नेसली हिरवा जोट...
पडलेल्या पाण्यानं अंगोपांगी मोहरावी म्हणून या मातीच्या कुशीत बिजवाई विसावायला हवी नं? त्यासाठीच तर तिफण सजते.
चाड्यावरीया मूठ चाडदोरला दिला रंग
वाटचा वाटसरू तिफणी पाहून झाला दंग...
हे ती शेजारणींना सांगते. स्त्रीसुलभ स्वभावानुसार धन्याचा अभिमान तर आहेच, पण सासरच्या या घरी राहून माहेराची सय काढत,
पानी पळते पळते झिरीमिरी
जमिनीच्या पोटी बंधू उनारते तुरी...
हे भाऊरायाचं कौतुकही आहे. एव्हाना पाऊस सुरू होतो. कौलं कितीही काळजीनं शाकारली तरी कधीकधी घर गळतं. सुटलेल्या उधाणवार्‍यानं इंधन वलं होतं. अनंत अडचणी असतात, पण तरी पाऊस हवाच असतो. या पावसाचं कोडकवतिक करण्याइतपत उसंत तिला नसते. मात्र,
येरे पाऊस राजा जरा जोरानं
रान धुईथुई करती वार्‍यानं
तुझ्या भरवशावर होतो आजवरी
उमजले मज तू आहे लहरी...
ही जाणीव तिला असतेच असते.
पाऊस येतो. एक दिवस, दोन दिवस, चार दिवस पुरेसा पाऊस झाल्याचा अंदाज घेत पेरणीसाठी कुणबी निघतो.
काया वावरात तिफन चाले गतीगती
शेल्याची केली वटी कुनबी उनारते मोती...
माणसं बिजवाई उनारण्यात नि बाया खत उनारण्यात गर्क होतात. तिफणच्या मागे वखर चालते. कामाला गती येते. आता उसंत नसते. तिला मात्र शेतातल्या कामाची आता जरा निस्ताई असते. पण, घरात मात्र पेरणीची उस्तवारी करायची असते.
तिफन चालली झरझर, वखर तिचा देर
तिफन आहे बा सती एक, डवरा तिचा लेक
तिफन आहे बा अकार, नांगर तिचा भ्रतार
आरती ओवाळू तिफनी, नंदी जुंपले दोन्ही...
अशी आरती होऊन कामाला सुरुवात होते. दिसभर पेरणीत गुंतलेला घरधनी आणि बाकी गडीमाणसं मध्यान्ही तिच्या वाटंकडं नजर ठेवून असतात. कारण, केलेल्या श्रमानं थकलेल्या शरीराला बळ मिळणार असतं, ते तिच्या हातच्या रुचकर भाजी-भाकरीनं. तेवढ्यासाठी तर तिनं उन्हाळ्यात मूगवड्या, करोड्याचा घाट घातला असतो. पावसापाण्याचा भाजीपाला आणायचा कुठून? झालंच तर सोबतीला गरमगरम उडदाची दाय रांधली की उरपूर होते, हे तिला अनुभवानं माहीत असतं. लाल मिरचीचा भुरका, आंब्याच्या लोणच्याच्या फोडी, तेल नि कांदा... सारं निगुतीनं बांधून शेतात नेणं अन्‌ कष्टलेल्या जिवांना अन्नपूर्णेच्या रूपानं तृप्त करणं, हे तिच्या लहानपणापासून अंगवळणी पडलंय. कारण तेच तिनं आजीला, आईला करताना बघितलं आहे. कितीही त्रास झाला तरी आपल्यालाच हे काम करायचं आहे, याची तिनं स्वतःच्या मनाला खूणगाठ बांधलेली असते. म्हणून ती म्हणते,
भाकरीची पाटी, माझ्या मानंला झालं वजं
शेतीत भुकेजलेलं पतिराज...
झरझर झरणारा पाऊस आपलं काम चोख करतो. भिजलेली धरती अंगोपांगी बहरते. पेरलेल्या बिजवाईच्या कोंबांच्या संगतीनं तणही वाकुल्या दाखवू लागते. आता मेघराजाच्या उसंतीची वाट असते. सूर्यकिरणांची आस असते.
सकाळच्या पार्‍यामंदी, पसरलं पिवळं ऊन
प्रकाशामंदी त्याच्या हासलं हिरवं रान
उघडीप मिळाली. िंनदणाची लगबग उडाली. सुबाबाईची पात जोमानं कामाला भिडली. एका पातीत किती बायका, याचाही हिशोब ठरलेला असतो. पातीची जी प्रमुख असते तिचं कमिशन म्हणजे एका बाईची मजुरी. बायांकडून काम करवून घेणं, एवढंच तिला करावं लागतं. पातीतल्या बायका िंनदण करतात. रामराव पानी पाजत फिरतो, तर बायांनी काढलेल्या गवताच्या मुठांचा गंज करून ठेवला की, शामराव डाल्यात भरून बांधावर टाकतो किंवा गुरांसाठी जमा करून ठेवतो.
बायका कष्टातही आपलं मनोरंजन शोधतात. कामाचा शिणवटा जाणवू नये म्हणून तोंडानं गप्पा नि हातानं उपसा चालू असतो. झालेल्या कामाप्रमाणे मजुरी मिळणार असते. काम करता करता एखादीच्या गाण्यांनाही बहर चढत असतो.
निंगाली सरकी, तन झाले लवूलाट
मांगून येते बाई, बंधू हा डवरा काळत...
किंवा
तिफनबाई तुये पेरने संपले
डवरे तुये भाऊ मांगून तुया आले...
पेरणी, वखरणी, डवरे सारी कामं क्रमानं होत असतात. माणसाच्या बरोबरीनं तिला शेतात धावावं लागतं तसंच घरातही राबावं लागतं. दिस मावळतो तेव्हा हातात मजुरी पडते ती मात्र माणसापेक्षा 100-50 नं कमीच असते; पण त्याची खंत करायला वेळ नसतो. आभाळ काळंभोर होतं. अल्लादी बरसतं. शेत उभ्यानं मोहरतं. तशी तीही सुखावते. पाऊस हा असा असतो हवाहवासा. जगाच्या नजरेत पावसाचं मोल वेगळं. पण, या गावशिवाराच्या दुनियेत तिच्यापुरतं त्याचं येणं, असणं, बरसणं जरुरीचं. कारण त्यावर केवळ तिचाच नाही, तर जगाचा व्यवहार अवलंबून आहे.
पिकामंदी पीक पर्‍हाटी पिकली
तिच्या वस्त्रानं सारी दुनिया झाकली...
आता जगरहाटी बदलतेय. पारंपरिक शेतीची साधनं अस्तंगत होताहेत. तिफणीची जागा ट्रॅक्टरनं घेतली आहे; पण तरीसुद्धा बाईच्या विश्वात, तिच्या कामात फारसा बदल झाला नाही आणि म्हणूनच पावसाच्या नि तिच्या नात्याही काही फरक पडला नाही. पावसाच्या थेंबानी जसं निसर्ग नवसर्जनतेचं रूप धारण करतो, तशीच आमची ही मायमाउलीही लोकसाहित्याचा मळा बहरवत शब्दांचं लेणं सजवत असते. काकर काढून सरकीचं बी टोचणंच ती जाणत नाही, तर शब्दांचं पीक फुलवणंही जाणते. कारण मुळातच तिच्याठायी असते कल्पकता!
लोकसाहित्याच्या रूपानं, पावसाच्या पडणार्‍या पाण्याबरोबर ती अशी बहरलेली दिसते. म्हणूनच तिच्या शब्दांत किंचित बदल करत म्हणावंसं वाटतं की, ‘अभाय गरजते, बाय माझी हरखते...’
 
सीमा शेटे (रोठे)