कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी हद्दपार

    दिनांक :21-Jun-2019
२०२२ मध्ये बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी खेळाला हटवण्यात आले आहे. भारतासाठी हा मोठा झटका आहे.भारताच्या कठोर विरोधाला न जुमानता, राष्ट्रकुल खेळांमधून नेमबाजी खेळ हद्दपार करण्याचा निर्णयाला अनुमती देण्यात आली आहे. राष्ट्रकुल खेळांच्या कार्यकारी मंडळाने महिला क्रिकेट, पॅरा टेबल टेनिस आणि बीच व्हॉलीबॉल या खेळांना मान्यता दिली आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या ५१ टक्के देशांनी या बदलाला आपली सहमती दर्शवली आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडली. यात भारताने एकूण ६६ पदकांची कमाई केली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजीतून आली होती. भारताने २०१८ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते. नेमबाजीला या स्पर्धेतून डावलल्यामुळे भारताच्या पदकतालिकेतील स्थानावरही परिणाम होणार आहे, शिवाय भारतीय नेमबाज एका मोठ्या व्यासपीठालाही मुकणार आहेत. 'नेमबाजीचं स्थान कॉमनवेल्थमध्ये अढळ राहावं म्हणून भारताने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण आयोजन समिती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती,' अशी माहिती सचिव राजीव भाटीया यांनी दिली.