सामान्यातील असामान्य डॉ. हेमा साने!

    दिनांक :21-Jun-2019
हेमा साने या पुण्यातील वनस्पतिशास्त्र अभ्यासक आहेत. एम. एस्सी. आणि पीएच. डी. संपादन केलेल्या हेमा साने या 1962 मध्ये पुण्यातील गरवारे कॉलेजच्या प्राध्यापिका व विभागप्रमुख निवृत्त झालेल्या आहेत. अभ्यास, लेखन आणि वाचन या ध्यासापोटी त्या अविवाहित राहिल्या. त्यांनी इ. स. 1960 पासून विजेचा वापर केला नाही. त्यामुळे घरात विजेचा दिवा, रेफ्रिजरेटर, वॉटर हिटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे त्यांच्या घरात नाहीत. निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्या सोबतीने राहणार्‍या आणि पूर्ण निसर्गचक्रावर अवलंबून आहेत.
 
 
 
पुण्यातील जोगेश्वरीच्या बोळीत जुन्या जीर्ण वातावरणात प्रचंड झाडाझुडुपांमध्ये त्या मजेत व स्वखुशीने राहतात. त्या विहिरीवरून पाणी आणतात. स्वतःची कामे स्वतः करतात. आजही त्या, त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला निःशुल्क मार्गदर्शन करत असतात. वनस्पतिशास्त्र विषयात रुची असणार्‍या अनेकांना हेमा साने या परिचित आहेत. आज 80 च्या घरात असूनसुद्धा स्वतःची कामे स्वतः करतात. अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास आणि त्यांच्याजवळ असणारी माहिती याही वयात ऐकताना आपण थक्क होऊन जातो. जवळपास 20 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
 
आता काळाची पावले ओळखून त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे दिवे घेतले आहेत. शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाल्यामुळे त्यांनी गॅसदेखील घेतला आहे. पण, या गॅसचा वापर एवढा मर्यादित आहे की, एक सििंलडर त्यांना चार-पाच महिने पुरतो. केरोसीनचा कोटा बंद झाला नसता तर गॅस घेण्याची वेळच आली नसती, असेही त्या सांगतात.
साधी राहणी, उच्च विचार याचा परिपाठ घालून आदर्श जीवन जगणार्‍या सामान्यातील असामान्य असणार्‍या डॉ. हेमा साने म्हणतात की, माणसं परप्रकाशी असतात चंद्रासारखी, पण माणसाने स्वयंप्रकाशी असावं काजव्यासारखं.
त्यांच्या एका मुलाखतीत खूप छान विचार ऐकायला मिळाला. त्यात त्या म्हणतात, सगळ्यांनी माझ्यासारखं राहावं असं माझं म्हणणं नाही. पण, जमेल तेवढी बचत करायचा प्रयत्न तर करता येतो ना? तोही केला जात नाही. जवळ जायचं असेल तर कशाला गाडी लागते? एका ठिकाणी कामाला जाणार्‍यांनी बस ठरवून एकत्र जाता येणार नाही का? चार जण चार मोटारी घेऊन एकाच ऑफीसमध्ये जातात. एका मोटारीतून चौघांना जाता येईल की नाही? पेट्रोल संपल्यावर काय करणार आहात? आणि ती वेळ आता दूर नाही. मीही प्रॅक्टिकली विचार करते. नोकरीची शेवटची 10 वर्षे मी लुना वापरली. तेव्हा विभागप्रमुख म्हणून माझ्या काही जबाबदार्‍या होत्या. मीच जर वेळेवर गेले नाही तर इतरांना काय बोलणार? त्यामुळे वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी मी लुना वापरली. पण, मंडईत जायला कशाला लुना? तिथे मी चालतच जाईल. मी जेव्हा लोकांची बोलणी ऐकते ना, फ्रीज डबल डोअरचाच हवा, फ्लॅट तीन बेडरूमचा हवाच वगैरे... तेव्हा मी माझी श्रवणयंत्रणाच बंद करून घेते.
हेमाताई साने यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असते, तशीच त्यांच्यावर टीकाही होत असते. त्याबाबत त्या बोलायला लागल्या की, त्यांचे विचार आपण ऐकतच राहतो. या अशा वेगळ्या जीवनशैलीबद्दल त्या म्हणतात, िंनदकाचे घर असावे शेजारी, असे तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवले आहे ना! त्यामुळे अशा टीकेची मी फारशी दखल घेत नाही, असे त्या सहजपणे सांगून जातात. त्यांच्यावर केल्या जाणार्‍या टीकेला त्यांनी दिलेले उत्तरही फार मार्मिक आहे. त्या म्हणतात, माझ्या घरामध्ये वीज नाही म्हणून िंकवा मी विजेचा वापर करीत नाही म्हणून मला मूर्खात काढणे योग्य आहे का? बरं, वीज नाही म्हणून मी मोर्चा नेला नाही. मी संपही केला नाही. मी साधा निषेधसुद्धा कधी नोंदविलेला नाही. अशा राहणीमुळे मी आदिवासी आहे, अशीही टीका केली जाते. असू दे मी आदिवासी. तुमचे काही बिघडले नाही ना! मी कधी कुणालाही त्रास द्यायला जात नाही. या उलट, वाड्यातील झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो म्हणून आजूबाजूच्या लोकांनी माझे आभारच मानले पाहिजेत. तुम्हाला हवे तसे वागले म्हणजे मी चांगली असे कसे म्हणता येईल? आधीपासून जशी राहात होते तशीच मी राहते, ही लोकांच्या दृष्टीने चूक आहे का? प्रवाहाबरोबर तर सगळेच पोहत असतात, पण प्रवाहाविरुद्ध पोहायला खूप ताकद खर्च करावी लागते. माझ्या राहणीमानामुळे तुमचे नुकसान तर केले नाही ना मी? मग मला माझ्या आनंदामध्ये राहू द्या की! आनंद कशामध्ये मानायचा, याची संकल्पना ही मी माझ्यापुरती निश्चित करून घेतली आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते. लेखन ही माझी विश्रांतीच आहे. चेंज ऑफ ऑक्युपेशन इज रेस्ट म्हणजे कामातील बदल हीच विश्रांती असते. त्यामुळे वाचन करून दमले की लेखन आणि लेखन करून दमले की शास्त्रीय संगीताचे श्रवण, हीच माझी विश्रांती असते.
निसर्गातल्या प्रत्येक जीवासंबंधी आपण आदर बाळगला, तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे, हे आज अनेक क्षेत्रात मांडलं जातंच आहे; ते कसं साध्य करायचं याचा वस्तुपाठ डॉ. हेमा साने यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. आपल्याला त्यातलं काही घ्यावंसं वाटतं की नाही, ते आपल्या क्षमता आणि अपेक्षांवर अवलंबून आहे.
खरंच, अशा असामान्य व्यक्ती बघितल्या की वाटतं, आयुष्य खूप सुंदर आहे. आपण प्रत्येक क्षण कसा जगतो, हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि आयुष्याची वेगळीच बाजू बघायला मिळते आणि मग सहज वाटतं, जे सत्य आहे, सुंदर आहे त्याचाच आजन्म ध्यास मिळावा.
(शब्दांकन : सर्वेश फडणवी)