योगदिन व सूर्यनमस्कार...

    दिनांक :21-Jun-2019
संयुक्तराष्ट्र संघाने काही अतिशय सन्माननीय दिवस घोषित केले आहेत. त्यातील 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. या दिवसाचे आणखीही बरेच महत्त्व आहे. ते असे की, याच तारखेपासून दक्षिणायन सुरू होते. दक्षिणायन ते उत्तरायण या कालामध्ये िंहदूंचे बरेच महत्त्वपूर्ण सण असतात. म्हणूनच या काळात कोणतीही दुर्घटना टाळता आली तर बरे, अशीही मान्यता आहे. तसेच 31 ज्येष्ठ शके 1941 अशीही शक संवत्सरात यासाठी मान्यता असून ज्येष्ठ या नावाप्रमाणे हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस, असेही मानले आहे.
 

 
 
योग आणि सूर्यनमस्कार
योगाचे अनेक प्रकार आहेत. विविध कारणांसाठी अलग अलग योग सुचविण्यात आले आहेत. योगथेरपी नावाच्या योगाचा औषधी म्हणून उपयोग करून रोग्याला दिलासा दिला जाऊ शकतो.
सूर्यनमस्कारामध्ये 12 योग संमीलित झाले आहेत. त्यापैकी दोन योग पुन:पुन्हा येतात. त्यामुळे तसे 10 योग सूर्यनमस्कारामध्ये संमीलित आहेत.
सूर्यनमस्कार काढण्यापूर्वी पुढील प्रार्थना म्हणण्यात यावी-
ध्येय: सदा सवित्र मंडल मध्यवर्ती
नारायण: सरसिजासनसनिविष्ट
केयुरवान मकरकुंडलवान किरीटी
हारी हिरण्यमयवपुधृतशंखचक्र
अर्थ : सूर्यमंडळता केंद्रस्थान असलेल्या सरसिजासन म्हणजे कमळ ज्याचे आसन आहे असा कमळात विराजित ज्याने (केयूर) बाजुबंद, कानामध्ये मगरीच्या आकाराची कुंडल आणि किरीट (मुकुट) घातलेला आहे. गळ्यात हार घातला आहे. ज्याची कांती सुवर्णमय, तेजस्वी आहे. ज्याने शंख आणि चक्र धारण केले आहे. अशा सूर्यनारायणाचे ध्यान करावे.
सूर्याची बारा नावे व अर्थ-
1) मित्र : म्हणजे जगनमित्र, मित्रभाव उत्पन्न करणारा.
2) रवि : सर्वांना पूजनीय व शब्द प्रवर्तक, स्फूर्तिदायी
3) सूर्य : उत्पादक व संचालक.
4) भानू : तेज व ओज देणारा.
5) खग : आकाशात संचार करणारा, इंद्रियांना शक्ती देणारा.
6) पुष्य : पुष्टी देणारा, यापासून अन्नधान्याची उत्पती होते.
7) हिरण्यगर्भ : वीर्यबलदायक.
8) मरीचि : सर्व पाप व रोगनाशक.
9) आदित्य : सर्वार्थाने सुखदायक.
10) सवित : सर्वेप्रादक. 11) अर्क : पूज्य
12) भास्कर : प्रकाशक, कांतिदायक.
स्थिती व लाभ
प्रथम पायाच्या टाचा जोडा, दोन अंगठ्यात एक वित अंतर ठेवावे, हात नमस्काराच्या स्थितीत ताठ केलेले छातीजवळ हनुवटी कंठाकडे.
लाभ : विचारतरंग शांत होतात. मनाची एकाग्रता वाढते. शरीर व मन यांचा समन्वय साधला जातो.
ऊर्ध्वनमस्कारासन : प्रथम हात मागे घेऊन दंड कानाला लागतील अशा स्थितीत जास्तीत जास्त मागे वाका व शक्यतोपर त्या स्थितीत थोडे थांबा.
लाभ : यामुळे पोटावर ताण पडतो, पोटाचे व कमरेचे विकार नाहीसे होतात आणि ऊर्जा वाढते.
हस्तपादासन : दंड कानावर दाबलेल्या स्थितीत ठेवून कमरेतून समोर वाकावे, गुडघे वाकू देऊ नये, तळहात पायांच्या बाजूला जमिनीवर टेकवावे व गुढग्याला कपाळ लावावे.
लाभ : या स्थितीत पोट, कंबर, गुढघे वगैरे विकार दूर होऊन उंची वाढते. ग्रंथीतील रक्तप्रवाह योग्य वाहतो. ज्ञानतंतू ओजस्वी होतात. सूर्यचक्र उत्तेजीत होते, यकृत, प्लिहा यांच्या क्रिया सुधारतात.
दक्षिणपाद प्रसरणासन : दोन्ही तळहात जमिनीवर तसेच टेकलेले. गुढघ्यात वाकवून दोन्ही हाताच्या मध्ये ठेवा. उजव्या पायाची बोटे जमिनीला टेकलेली, टाच वर, कंबर दाबा, छाती उंच करून वर पाहा. या स्थितीत डाव्या पायाची पोटरी व मांडी मिळवा व मांडी पोटावर दाबा.
लाभ : या स्थितीत प्लिहा दबते. कमरेवर व मानेवर ताण पडल्यामुळे व छाती उठल्यामुळे त्यातील विकार दूर होतात. पोटाला फायदा होतो.
द्विपाद प्रसरणासन : डावा पाय मागे ताणून उजव्या पायाला जोडा. कंबर जास्त उंच िंकवा दाबून ठेवू नका. मानेपासून टाचेपर्यंत एक सरळ रेषा होऊ द्या. पोट आत ओढा. डोक्यापासून पायाकडे उताराची स्थिती आणा.
लाभ : या स्थितीत हात, पाय, कणा व पोट यांना फायदा होतो.
भुजान्वासन : हात व पाय जमिनीवर तिथेच टेकलेले ठेवा. गुढघे व डोके जमिनीवर टेकवा व कुल्ले टाचांवर टेकवा.
लाभ : मांड्या, पोटर्‍या, कणा, पोट, श्वासनलिका, मान यांना फायदा होतो.
साष्टांग प्रणिपातासन : ही पूर्णस्थिती होय. हात, पाय, गुढघे न हलविता छाती व डोके जमिनीवर टेकवा, पोट आत ओढा, श्वास सोडा, हनुवटी गळ्यावर. दाबा छाती रुंद होते.
भुजंगासन : हातपाय जमिनीवर लावून कंबर दाबून छाती उंच उठवून वर पाहा. लाभ : या स्थितीत छाती उठावदार व रुंद होते. हात सशक्त होतात. पचनशक्ती वाढते. यकृत, पांथरी यांचे स्वास्थ्य सुधारते.
भूधरासन : हातपाय न हलविता कंबर उंच करून डोकं खाली करा. हनुवटी गळ्यावर दाबा, टाचा जमिनीला टेकवा. पोट आत ओढा.
लाभ : या स्थितीत हात, पोट, मांड्या, गुढघे, पोटर्‍यांना फायदा होतो.
दक्षिणपाद संकोचनासन : उजवे पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये ठेवून डावा पाय मागे लांब ताणा, कंबर दाबून छाती उंच करून वर पाहा.
लाभ : या स्थितीत यकृतावर दाब येऊन, यकृताचे दोष दूर होतात. तसेच कमरेवर व मानेवर ताण पडल्यामुळे व छाती उठल्यामुळे यातील विकार दूर होतात. पोटालाही फायदा होतो.
नमस्कारासन : कमरेतून सरळ होऊन टाचा जोडा. हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या जवळ ठेवा. हनुवटी िंकचित कंठाकडे वळवावी. म्हणजे आपण पूर्व स्थितीत येतो.
लाभ : अगदी सुरवातीच्या क्र. 1 पूर्वी दिलेल्या लाभाप्रमाणे लाभ होतात.
घ्यावयाची काळजी
1) सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना आहे. यासाठी पूर्वेकडे तोंड करूनच सूर्यनमस्कार काढावेत. स्नान केल्यानंतर सूर्यनमस्कार काढावे, अशी प्रथा आहे. तसेच स्नान थंड पाण्याने करणे अधिक हिताचे आहे. 2) सूर्यनमस्कार पोट रिकामे असताना सकाळच्या वेळेस काढणे अधिक योग्य ठरेल. प्रसन्न चित्ताने सूर्यनमस्कार काढल्यास दिवस चांगला जातो, असा बहुतेकांचा अनुभव आहे. 3) सूर्यनमस्कार कमीतकमी 12 वेळा व जास्तीत जास्त 144 वेळा काढावे, असे अभिप्रेत आहे. 4) थकवा वाटत असेल तर सूर्यनमस्काराची संख्या आटोपशीर करावी. 5) एका मिनिटात 2 ते 5 सूर्यनमस्कार घालावेत, पण प्रत्येकालाच एवढ्या गतीने हे जमणार नाही. 6) सूर्यनमस्कार काढल्यानंतर एक तासपर्यंत भोजन करू नये. पाणी पिणे अथवा हलकासा एखादा पदार्थ ग्रहण करणे शक्य आहे.
सूर्यनमस्कारानंतरची प्रार्थना
आदिप्रेषु नमस्कारान ये कुर्वन्ती दिले जाते
जन्मानंतर सहस्त्रषु दारिद्र्यं नौप जायते।।1।।
अकाल मृत्यू हरणम सर्वव्याधिविनाशनम
सूर्यपादोदकं तीर्थ जठरे धाट्याम्यहम।।2।।
अर्थ : जे रोज सूर्यनमस्काराद्वारे सूर्यापासना करतात त्यांना शतजन्मापर्यंत मन, बुद्धी शरिराचे दारिद्र्य येत नाही. व्याधीचा नाश होतो व अकाली मृत्यू येत नाही. म्हणून सूर्यनमस्काराद्वारे सूर्याचे कृपातीर्थ मी प्राशन करतो.
विशेष महत्त्व
21 जून अर्थात 31 ज्येष्ठ आहे. परिणामत: सूर्याची ऊर्जा या दिवशी पृथ्वीला जास्तीत जास्त मिळते. तसेच 22 डिसेंबर हा सर्वांत लहान दिवस आहे. तसेच 22 मार्च व 22 सप्टेंबर या दोन दिवसात रात्र व दिवस सारखेच असतात. वरील सर्व बाबीचे सार असे की, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरविण्यात आलेला आहे.
• डॉ. विलास सावजी
(अॅडव्होकेट व कर सल्लागार, खामगाव)
07263-252350