अमेरिकन लेखिकेचा ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

    दिनांक :22-Jun-2019
न्यूयॉर्क, 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप न्यू यॉर्कमधील एका लेखिकेने केला आहे. ही लेखिका महिलांच्या समस्यांसंबंधी स्तंभलेखन करते. दोन दशकापूर्वी ट्रम्प यांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेचा आरोप फेटाळून लावत ही बातमी बनावट असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 
 
 
न्यू यॉर्कमधील 75 वर्षीय ई. जीन कॅरोल यांच्या ‘व्हॉट डू वूई नीड मेन फॉर? या पुस्तकात त्यांनी हा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी 1990च्या दशकात न्यू यॉर्क सिटीच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या खोलीत आपल्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप या पुस्तकात त्यांनी केला आहे. या पुस्तकातील महत्त्वाचे अंश ‘न्यू यॉर्क मॅगझीन’च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्यासह अनेक पुरुषांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा दावासुद्धा त्यांनी या पुस्तकात केला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मला बघून हिंसक झालेल्या ट्रम्प यांनी माझ्यावर बलात्कार केला, असे या महिलेने सदर पुस्तकात म्हटले आहे.
 
ट्रम्प यांच्यावर सार्वजनिकरीत्या लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या 16 महिलांच्या यादीत कॅरोल यांचा समावेश आहे. यातील बहुतांश महिलांनी 2016च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही आठवड्यांआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
 
दरम्यान, कॅरोल यांनी केलेला आरोप ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. मी कॅरोल यांना कधीच भेटलो नाही. पुस्तक खपवण्यासाठी लेखिकेचा हा डाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुस्तकाची विक्री व्हावी यासाठी प्रसिद्धीचा बनाव करणार्‍या लोकांना लाज वाटायला हवी, असा संतापही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.