चार महिन्यांत कारवाई करा, अन्यथा काळ्या यादीत टाकू; एफएटीएफचा पाकला इशारा

    दिनांक :22-Jun-2019
फ्लोरिडा, 22 जून
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान करीत असलेल्या कारवाईच्या देखाव्यावर तीव‘ संताप व्यक्त करताना, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) आपल्या 27 सूत्री कृती योजनेची पूर्तता करण्यासाठी पाकिस्तानला आणखी चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत जगाचे समाधान होईल, अशा पद्धतीने दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई झाली नाही, तर काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा एफएटीएफने दिला आहे. दहशतवाद्यांना आपल्या भूमीत आश्रय देणार्‍या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडण्यासाठी आता संपूर्ण जगच एकत्र आले असल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. 
 
 
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे एफएटीएफ पाकिस्तानच्या मुद्यावर एक आठवड्यापासून सुरू असलेली बैठक नुकतीच संपली. दहशतवाद ही जागतिक समस्या झाली आहे आणि बहुतांश दहशतवादी गट पाकिस्तानच्याच भूमीत आश्रयात असून, याच भूमीत त्यांना आर्थिक रसद पुरवली जाते. अन्य देशांमध्ये हल्ले करून हे अतिरेकी पुन्हा पाकिस्तानच्या भूमीत आश्रय घेतात. ही जागतिक चिंता दूर करण्यासाठी पाकिस्तानला आम्ही आणखी चार महिन्यांची मुदत देत आहोत. तोपर्यंत हा देश ग्रे यादीतच राहील. मात्र, ही वाढीव मुदत संपल्यानंतर आम्ही पाकिस्तानची कुठलीही गय करणार नाही, काळ्या यादीत टाकणे, हाच एकमेव पर्याय आमच्याकडे उपलब्ध राहील, असेही एफएटीएफने स्पष्ट केले.
 
या संस्थेने जून 2018 मध्ये पाकिस्तानला ‘ग्रे’ यादीत टाकले होते. या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला 27 निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे, पण या वर्षभराच्या काळात जगाचे समाधान होईल, असे कोणतेही ठोस पाऊल या देशाने उचलले नाही, असे एफएटीएफच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जानेवारी 2019 पर्यंत देण्यात आलेली मुदत मे महिन्यापर्यंत वाढविण्यात आली होती. दरम्यान, पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला ब्रिटन आणि अमेरिकेसह अन्य देशांनी पाठिंबा दिला असून तुर्कस्थानने विरोध केला असल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानचा घनिष्ठ मित्र असलेला चीनही एफएटीएफच्या बैठकीपासून दूर राहिला.