बालाकोटची पुनरावृत्ती होणार नसल्यास हवाई हद्द खुली करू

    दिनांक :22-Jun-2019
पाकिस्तानने ठेवली अट
इस्लामाबाद,
बालाकोटसारखा हवाई हल्ला भविष्यात पुन्हा होणार नाही, अशी हमी भारताने दिल्यास, आपली हवाई हद्द खुली करण्याची आमची तयारी आहे, अशी अट पाकिस्तानने ठेवली आहे.

 
 
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर हल्ला करण्याची परवानगी भारतीय हवाई दलाला दिली होती. त्यानुसार, हवाई दलाने 12 मिराज-2000 या विमानांच्या सहाय्याने बालाकोटमध्ये बॉम्ब टाकले होते. यात 300 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले होते, असा दावा करण्यात आला होता. मात्र, कॉंगे‘ससह अन्य राजकीय पक्षांनी, असा कोणताही हल्ला हवाई दलाने केला नसून, केवळ काश्मीरला लागून असलेल्या सीमेपुरताच हा हल्ला मर्यादित होता, असा तर्क लावला होता, पण पाकिस्तानने आता हवाई हद्द खुली करण्यासाठी, भारताकडून बालाकोटची पुनरावृत्ती होणार नाही, याची हमी मागितल्याने हे सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तोंडघशी पडले आहेत.
 
पाकिस्तान सरकारने आपली हवाई हद्द भारतासाठी बंद ठेवण्याची मुदत 28 जूनपर्यंत वाढवली आहे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत आणि या देशासाठी हवाई हद्दही खुली करायची आहे. मात्र, यासाठी भारत सरकारने आम्हाला, बालाकोटची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत ठोस वचन द्यायलाच हवे, असे पाकिस्तान सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने भारतातील एका इंग‘जी दैनिकाला सांगितले.
 
पाकिस्तान सरकारने आपली िंचता भारताकडे व्यक्त केली आहे. ती भारत सरकारने काळजीपूर्वक हाताळायला हवी. आम्हाला ठोस वचन हवे आहे. पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद करून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण या काळात दोन्ही देशांमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. परिणामी आमच्या हवाई क्षेत्राला नुकसान सहन करावे लागत आहे, असे एका बड्या अधिकार्‍याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
 
मागील महिन्यात पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले होते की, आम्हाला तणाव कमी करायचा आहे. तो कमी झाल्यानंतर आम्ही भारतासाठी आपली हवाई हद्द खुली करू. या निर्णयाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसत आहे, कारण, अन्य देशांच्या विमानांनाही दूरचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. भारताने सहकार्य केल्यास हवाई हद्द खुली होऊ शकते.