अमेरिका-इराण वादावर संयुक्त राष्ट्रात होणार चर्चा

    दिनांक :22-Jun-2019
- 24 जूनला बैठकीची शक्यता
 
संयुक्त राष्ट्रे, 
इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’ने अमेरिकेचे मानवरहित टेहळणी विमान ‘ड्रोन’ पाडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेश नौदल आणि हवाई दलाला दिले होते. मात्र, प्रत्यक्ष हल्ला सुरू होण्यापूर्वी अवघी 10 मिनिटे आधी त्यांनी ते आदेश रद्द केले. आता या वादावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक 24 जून रोजी दुपारी होण्याची शक्यता आहे. 
 
 
इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर या दोन्ही देशांतील वाद विकोपाला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिकेतील वादावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावल्याची माहिती सूत्राने दिली. या बैठकीत आखातीमधील तेलवाहू टँकरवरील हल्ला आणि अमेरिकेचे पाडलेले ड्रोन यावर चर्चा होणार आहे.
 
इराणवर बॉम्ब हल्ला करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. बॉम्बहल्ला झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागेल. हे सर्व टाळण्यासाठी आपण हल्ला करण्याच्या निर्णयापासून माघार घेतल्याचे ट्रम्प शुक‘वारी म्हणाले होते. दरम्यान, ओमानच्या खाडीवरून जाणार्‍या अमेरिकेच्या ड्रोनला दोन वेळा इशारा दिला होता. त्यानंतर ते पाडण्यात आले, असे इराणने म्हटले आहे. पर्शियाच्या आखातीतील तणाव वाढल्यानंतर जगभरातील प्रमुख विमान कंपन्यांनी ओमानच्या आखातीवरील विमानांचे मार्ग सध्या स्थगित केले आहेत.