५० हजार रुपयांनी भरलेली बॅग पोलिसाने केली परत

    दिनांक :22-Jun-2019
मुंबई : एकीकडे पोलीस यंत्रणेवर लाचखोरीचा, भ्रष्टाचाराचा, निष्काळजीपणाचा आरोप होत असतानाच मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ठोकळ यांच्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पणामुळे समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. एका नागरिकाची ५० हजार रुपयांनी भरलेली बॅग त्यांनी परत केली. तुकाराम ठोकळ यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलनेही त्यांची दखल घेतली आहे.

तुकाराम ठोकळ काही दिवसांपूर्वी भायखळा येथे ड्युटी करत होते. त्यावेळी भायखळा पुलावर ५० हजार रुपयांनी गच्च भरलेली एक बॅग त्यांना आढळली. त्यांनी ती लगेच ताब्यात घेतली. बाइकवरून जात असताना जितेंद्र सोनी यांच्या अनावधानाने ती बॅग भायखळा पुलावर पडली होती. त्या बॅगचा शोध घेत जितेंद्र सोनी काही वेळात परत येताच ठोकळ यांनी लगेच त्यांना ती बॅग त्यांच्या हवाली केली. जितेंद्र सोनी यांनीही ठोकळ यांचे आभार मानले आहेत.