नामस्मरणभक्ती

    दिनांक :22-Jun-2019
परमेश्वराचे नामस्मरण का, कशाकरिता करायचं, असा प्रश्न बर्‍याचदा निर्माण होतो. आपण मनुष्यदेह घेऊन जन्माला आलो आहोत. प्रत्येक जिवाच्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती आहे, पण ती सुप्तावस्थेत आहे. ती सुप्त असूनसुद्धा मनुष्य बुद्धिमान असू शकतो. आपण जर भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, तर मनुष्याच्या अंतरंगात असलेली ईश्वरीशक्ती जागृत होते. त्यामुळे षड्रिपूंवर ताबा मिळवता येतो. सदसद्विवेक बुद्धी निर्माण होते. वस्तूचे नाव िंकवा नाम म्हणजे वस्तूची खूण असणारा नुसता शब्द नव्हे. नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी आदिसंकल्पाची म्हणजेच ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्मशक्ती. नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारा दुवा होय. नामस्मरण म्हणजे काय? आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते, ही जाणीव जागी राहणे, याला नामस्मरण म्हणतात. प्रपंचामध्ये वावरताना भगवंतांचे सारखे विस्मरण होते. विस्मरण होऊ नये यासाठी नामासारखा अन्य उपाय नाही. म्हणून श्रीसमर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात. नामस्मरण ही नवविधाभक्तीतील तिसरी भक्ती. नाम अखंड जपत जावे. वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे. प्रातःकाळी, दुपारी, सायंकाळी नामस्मरणाचा सराव करावा, सवय करावी. सुखदुःख, आनंद, स्वस्थता, अस्वस्थता, िंचता अशा मनाच्या कोणत्याही अवस्थेत नामस्मरणावाचून राहू नये. जीवनात स्थित्यंतरे येतच राहणार. सर्व दिवस सारखे राहात नाहीत. कधी यश तर कधी अपयश. सुस्थिती, दु:स्थिती अशा प्रतिकूल-अनुकूल परिस्थिती येतच राहणार, पण नामस्मरण स्थिर ठेवावे. मोठे वैभव प्राप्त झाले, सामर्थ्य वाट्यास आले, सत्ता मिळाली, फार मोठे ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली, तरी नामस्मरण सोडू नये. नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात, विघ्ने निवारण होतात. श्रद्धा ठेवून नामस्मरण केले, तर भूतपिशाचांची पीडा नाश पावते. अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात. नामस्मरणाने जिवाला अंतकाळी उत्तम गती मिळते. नामस्मरण करण्यासाठी वयाचे बंधन नाही. तरुणपणी, म्हातारपणी, संकटाचे प्रसंगी सदासर्वकाळ व अंतकाळीसुद्धा नामस्मरण करीत असावे. नामस्मरण केल्याने अनेक जण श्रेठत्वाला जाऊन पोहोचले आहेत. नामस्मरणाची थोरवी भगवान श्रीशंकर जाणतात. तो विश्वेश्वर लोकांना नामस्मणाचा उपदेश करतो.
 
 
 
काशीत देह ठेवणार्‍या माणसाला श्रीशंकर रामनाम कानात सांगतात व तो मुक्त होतो. म्हणून रामनामामुळे वाराणशीला मुक्ती देणारे क्षेत्र म्हणतात. वाल्मिकीने रामराम म्हणण्याऐवजी मरामरा असे उफराटे नाम घेतले, तरीसुद्धा भगवंताने त्याचा उद्धार केला. इतकेच नव्हे, तर शतकोटी श्लोक रचून रामचरित्राची रचना केली. हा सगळा नामाचा महिला. अनेकप्रकारच्या दु:ख-संकटातून भगवंताने प्रल्हादाला वाचवले, कारण तो अहोरात्र नाम घेत होता. आपल्या भक्तासाठी त्याने नृिंसह अवतार घेतला. अजाणतेपणी का होईना, अंतकाळी अजामेळाने नारायण नाम घेतले आणि त्याचा उद्धार झाला. इतकेच नव्हे, तर नामाने पाषाणसुद्धा तरले, मोठमोठे महापापी केवळ नामस्मरणाने पवित्र होऊन गेले. परमेश्वराची नामे अनंत आहेत. नित्य नियमाने त्याचे स्मरण केले, तर माणूस तरून जातो. नामस्मरण करणार्‍याला यमयातना होत नाहीत. कोणत्याही नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोचू शकतो. भगवंताच्या हजारो नामांमधील एक नाम पसंत करावे व मनापासून त्याचा जप करावा. श्रद्धा असावी, आपले सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस मोठा पुण्यात्मा बनून जातो. माणसाने इतर काहीच न करता फक्त रामनामाचा जप करावा, तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. भगवंताचे अखंड अनुसंधान साधणे हे सार्‍या परामार्थाचे मर्म आहे. इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला, तर जे साधायचे ते साधले म्हणून समजावे. महापापाचे मोठे डोंगरदेखील रामनामाच्या जपाने नष्ट होतात. नामाचा महिमा अपरंपार आहे. कोणत्याही म्हणजे चारही वर्णाच्या माणसांना नाम घेण्याचा अधिकार आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान-मोठा, स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, अडाणी, मूर्ख असा भेदभाव नाही. नामाच्या आधाराने मूर्खातील मूर्खसुद्धा सुखाने संसारातून पार होऊ शकतो, पण त्यासाठी निरंतर नामस्मरण गरजेचे आहे.
नामे संकटे नासती। नामे विघ्ने निवारती।
नामस्मरणे पाविजेतो। उत्तम पदे।।
।।जय जय रघुवीर समर्थ।।
वृषाली मानेकर
9527597412