पक्षपाताने अंध राजकीय विश्लेषकांना धडा

    दिनांक :23-Jun-2019
देवेंद्र कुमार
•विजय चौथाईवाले
 
28 मे 2019 रोजी वाराणसी येथे आभारप्रदर्शनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील राजकीय विश्लेषक अजूनही 20 व्या शतकातच जगत आहेत. त्यामुळे 21व्या शतकाच्या भारतीय राजकारणातील वास्तवाची त्यांना कल्पनाच आलेली नाही. गेल्या पाच वर्षांतील तसेच नुकत्याच पार पडलेल्या 2019च्या सार्वत्रिक निवडणुकींचे योग्य विश्लेषण करण्यात राजकीय विश्लेषकांना जे सातत्याने अपयश आले, त्या संदर्भात कदाचित पंतप्रधानांनी वरील मत व्यक्त केले असावे. भारतीय समाजाचे सामाजिक व भौगोलिक स्वरूप व्यामिश्र बहुलवादी असल्याकारणाने, तसेच येथे बहुपक्षीय निवडणूक पद्धती असल्यामुळे, भारतातील निवडणुकांचे योग्य भाकीत करणे तसेही एक अवघड कार्य आहे. तशातच, वैयक्तिक पक्षपाती दृष्टीमुळे विश्लेषकांनी आपल्या प्रतिपादनातील वस्तुनिष्ठता गमविली असेल, तर हे कार्य अधिकच अवघड होऊन बसते. 2019 च्या जनादेशाचे किंवा मोदींच्या नेतृत्वातील कुठल्याही निवडणुकांचे, मग त्या गुजरातमधील असोत वा भारतातील, इतरत्रही योग्य पूर्वानुमान काढण्यात या विश्लेषकांना त्यांच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे का व कुठे अपयश आले ते बघू या.
 
राजकीय मंचावर नरेंद्र मोदी यांचे आगमन होण्यापूर्वी, इंदिरा गांधींना सोडले तर दुसरा कुठलाही नेता अखिल भारतीय निवडणुकीत एक ध्रुव बनलेला दिसून येत नाही. खरेतर, 2001 साली ते ज्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, तेव्हापासूनच ते राजकीय निरीक्षक, मीडिया आणि सामान्य जनता यांच्या सतत नजरेत राहिले आहेत; मग त्याची कारणे काहीही असोत. भविष्यातही देशपातळीवरील राजकारणात या व्यक्तीच्या भूमिकेची कल्पना बर्‍याच आधी फारच कमी लोकांना आली होती, त्यात काही विरोधातलेही होते. विशेषत: 2007 च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा मोदींच्या नेतृत्वात भाजपाने पुरेसे बहुमत प्राप्त केले, त्यानंतर मोदींच्या या भविष्याची कुजबुज सुरू झाली होती. 
 
 
सुमारे पन्नास वर्षांनंतर भारतीय जनतेने एखाद्या नेत्याला दुसर्‍यांदा पूर्ण बहुमतासह निवडले आहे अन्‌ तेही आधीपेक्षा जास्त मोठ्या जनादेशाने. त्याआधी 1971 साली इंदिरा गांधी अशाच प्रकारे दुसर्‍यांदा निवडून आल्या होत्या. परंतु, त्यावेळेस कॉंग्रेसला 43.68 टक्के मते मिळाली होती आणि मोदींच्या नेतृत्वातील रालोआला सुमारे 45 टक्के मते मिळाली आहेत. 2019 च्या निवडणूक प्रचाराच्या काळात बहुतेक राजकीय विश्लेषकांचे एकमत होते की, मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून समोर येईल, परंतु त्याला 2014 सारखा विजय काही मिळणार नाही. कारण, 2014च्या उलट यावेळी काही मोदी लाट दिसत नाही. खरेतर, 2019 मध्ये मोदी लाट नव्हती, ती मोदी-त्सुनामी होती! परंतु, याचे पूर्वानुमान लावण्यात विश्लेषकांना अपयश आले. याचे कारण, मोदींविरुद्ध त्यांची पूर्वग्रहग्रस्त दूषित दृष्टी हेच आहे.
 
जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर नरेंद्र मोदी हेच एक नेते आहेत, ज्यांनी देशपातळीवरील निवडणुकीचा सारा भार एकट्यानेच आपल्या खांद्यावर वहन केला. परंतु, मोदींचे वेगळेपण हे आहे की, त्यांनी हा विजय आपल्या सरकारच्या प्रदर्शनाच्या आधारे मिळविला केला. या उलट, नेहरूंना स्वातंत्र्यानंतर समाजात गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा जो जल्लोष होता त्याचा फायदा मिळाला, इंदिरा गांधींनी नेहरूंच्या या वारशाचा अधिकृत वापर करून घेतला आणि वाजपेयी हे उत्कृष्ट वक्तृत्वासोबतच पर्यायी राजकारणाचे प्रतीक ठरले होते. परंतु, नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 13 वर्षे आणि पंतप्रधान म्हणून पाच वर्षे प्रचंड मेहनत घेऊन, सबका साथ-सबका विकास या सूत्रावर आधारित, गरिबांना केंद्रस्थानी ठेवत, एका नव्या प्रशासकीय प्रतिमानाला (मॉडेलला) विकसित केले.
 
विश्लेषकांना मात्र हे ओळखण्यात अपयश आले. कारण ते मोदींना जातीय राजकारण करणारा, ‘फूट पाडणार्‍यांचा नेता’ म्हणून खोडसाळपणे रंगविण्यातच मशगूल होते. प्रधानमंत्री आवास योजना (घर), उज्ज्वला (एलपीजी), उजाला (वीज), स्वच्छ भारत (शौचालय), आयुषमान भारत (आरोग्य विमा), किसान सम्मान निधी (शेतकर्‍यांना 6 हजार रुपये मानधन) इत्यादी गरिबाभिमुख योजनांमुळे नरेंद्र मोदी, भारतीय समाजाच्या सामाजिक व आर्थिक उतरंडीतील सर्वात खालच्या घटकांपर्यंत पोहोचले आहेत, हे या विश्लेषकांना दिसलेच नाही. पाच वर्षांच्या शेवटी, मोदी सरकार समाजातील सर्व भेदांना बाजूला सारून 22 कोटी गरीब लोकांच्या घरात पोहोचले होते.
 
या गरिबांच्या घरापर्यंत पोहोचण्यामुळेच, जात व संप्रदायाच्या आधारे आतापर्यंत असलेल्या भेदरेषा पुसल्या गेल्या आणि मोदींसाठी एक नवी मतपेढी तयार झाली. 22 कोटी लाभार्थ्यांशी थेट संपर्काच्या भाजपाच्या विशेष अभियानाचे फळ मिळाले आणि त्यामुळे ही 22 कोटी मते रालोआच्या खात्यात जमा झाली. या संदर्भात उत्तरप्रदेश हे एक चपखल उदाहरण ठरावे. विशिष्ट प्रकारची पक्षपाती दृष्टी तसेच 20 व्या शतकातील प्रतिमानामुळे, विश्लेषकांनी स्वत:ला जातीच्या आधारावरील आकडेमोडीतच बंदिस्त करून ठेवले आणि त्यांनी सपा, बसपा व लोकदल यांच्या महागठबंधनाला प्रचंड यश मिळण्याचे भाकीत केले.
 
भारतातील विश्लेषकांना ‘प्रस्थापितविरोधी’ (ॲण्टीइन्कम्बन्सी) भावनेचे खूपच आकर्षण असल्याचे दिसून येते. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात सार्वत्रिक निवडणुकीत कधीही ‘प्रस्थापितानुकूल’ (प्रोइन्कम्बन्सी) भावना बघितलीच नाही, जे या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य होते. प्रस्थापितविरोधी भावनेच्या आसक्तीपायीच त्यांनी, काही विधानसभा व पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवावरून चुकीचे निष्कर्ष काढलेत. काही महिन्यांपूर्वीच ज्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता, त्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील 65 पैकी 63 लोकसभा मतदारसंघात मोदींच्या आवाहनामुळे भाजपाला विजय मिळविता आला. एवढेच नाही, तर प्रस्थापित-विरोध प्रमेयाला बळ देणार्‍या ज्या नऊ पोटनिवडणुकांत भाजपा पराभूत झाली होती, त्या सर्वच्या सर्व नऊही लोकसभेच्या जागा भाजपाने यावेळी जिंकल्या आहेत.
 
मतदान सात टप्प्यांत व सहा आठवडे चालणार असल्यामुळे, जनादेशाचा कल ओळखण्यासाठी विश्लेषकांनी, इतर कारणांचा विचार करण्याऐवजी मतदानाच्या टक्केवारीलाच अधिक महत्त्व दिले. या वेळच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मतदान झाल्यानंतरच्या 24 तासांत संशोधित होत होती. परंतु, भाजपासाठी प्रतिकूल परिस्थिती असल्याचे दाखविण्यासाठी हे विश्लेषक इतके उतावीळ होते की, संध्याकाळी सहा वाजताच्या मतदानाच्या आकड्यांवरूनच ते आपापली प्रमेये जाहीर करू लागायचे की, मतदारांमध्ये अजीबात उत्साह नाही आणि मतदानाची कमी टक्केवारी मोदींच्या विरुद्ध जाणार आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 67.47 टक्के मतदान नोंदविले गेले, जे 2014 च्या आकड्यापेक्षा 1.03 टक्क्यांनी अधिक आहे.
 
जेव्हा मतदानाची टक्केवारी अधिक असल्याचे सिद्ध झाले, तेव्हा मोदीविरोधी वैयक्तिक पक्षपाताला रुचणारी आणि मतदानाच्या संख्येवर आधारित या सर्वांची प्रमेये उलटी झालीत. उदाहरणार्थ, न्यूयॉर्कस्थित एका आंतरराष्ट्रीय पत्रिकेने मतमोजणीच्या एक दिवस आधी म्हणजे 22 मे रोजी लिहिले- ‘बहुतेक भारतीयांनी जात किंवा संप्रदायाच्या आधारे मतदान केले आहे. परंतु, दर निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष बदलविण्याकडे मतदारांचा कल असतो. मतदानाची टक्केवारीही अधिक आहे (गेल्या निवडणुकीच्या 70 टक्क्यांच्या आसपास), आणि प्रस्थापित सरकारला पराभूत करण्यासाठी भारतीय मतदार प्रसिद्ध आहेत.’ प्रिय विचारवंत मित्रांनो! मोदी पराभूत होत आहेत हे दाखविण्याची एवढी घाई कशापायी? 24 तास थांबले असते, तर तुम्हाला असे खजील व्हावे लागले नसते.
 
मोदी आणि शाह यांच्या प्रचंड मेहनतीला या मंडळींकडून नेहमीच हताशा म्हणूनच रंगविले गेले. परंतु, मीडियातील मित्र हे विसरले की, साध्या साध्या विजयांना मोठ्या विजयामध्ये रूपांतरित करण्यावर मोदी आणि शाह यांचा विश्वास आहे. निवडणूक प्रचार काळात आपण अशा बातम्या वाचल्या असतील की, ज्या ठिकाणी भाजपा अडचणीत आली असल्याचा अंतर्गत अहवाल आल्यानंतर तिथे मोदींच्या सभा वाढविण्यात आल्या. 2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी वाराणसीमध्ये प्रचारासाठी तीन दिवस तळ ठोकल्याच्या बातम्या आपल्या स्मरणात असतीलच. यावर वरताण म्हणजे, या निवडणुकीत सपा व कॉंग्रेसची आघाडीजिंकत असल्याचे निष्कर्षही काढण्यात आले होते. परंतु, भाजपाला 320 जागांचा ऐतिहासिक जनादेश मिळाला. पुन्हा एकदा हा दोष विश्लेषकांचा नव्हता, तर त्यांच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीचा होता. कदाचित, मर्यादित प्रयत्नांनी नेहमीच निवडणूकजिंकणार्‍या ‘दिवाणखानी-राजकारण्यांच्या’ तुलनेत, या मंडळींचा मोदी व शाह यांचा अभ्यास कमी पडला असावा.
 
भाजपाच्या ‘पन्ना प्रमुख’ (मतदार यादीच्या एका पानावरील मतदारांची जबाबदारी असलेला कार्यकर्ता) संकल्पनेची, ‘स्कॉच’चे घोट घेत चर्चा करणार्‍या ‘खान मार्केट गँग’ने नेहमीच खिल्ली उडविली होती. परंतु, संघटनेची शक्ती काय असते हे ते विसरून गेले असावेत. कदाचित असेही असेल की त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत, नेत्यांची लोकप्रियता आणि सरकारचे चांगले काम यांना निवडणुकीतील विजयात रूपांतरित करण्यात संघटनेची यंत्रणा किती महत्त्वाची असते हे त्यांनी कधी पाहिलेच नसण्याची शक्यता आहे. भाजपाने त्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात गेली पाच वर्षे पक्षाचे सदस्य 11 कोटींहून अधिक करणे, या सदस्यांनी पक्षाचे सिद्धांत/विचार आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे यासाठी बहुस्तरीय योजना सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
 
अशा रीतीने या अथक परिश्रमातून एक प्रचंड अशी शक्तिशाली संरचना निर्माण झाली. मतदान केंद्रस्तरावरील लाखो कार्यकर्त्यांना, ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ नावाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सक्रिय करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जो पुढाकार घेतला, त्याचेही महत्त्व या विश्लेषकांना समजलेच नाही. पाच ते सात मतदान केंद्रांचे एक शक्तिकेंद्र, अशा शेकडो शक्तिकेंद्रांच्या 100 हून अधिक मेळाव्यांना उपस्थित राहून त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी अमित शाह यांनी रात्रीचा दिवस केला होता. मोदी व शाह हे दोघेही सामान्य पक्षकार्यकर्त्यांतून पुढे आले असल्यामुळे, विजयानंतरच्या प्रत्येक भाषणात त्यांनी पक्ष संघटना आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा नेहमीच गौरवाने उल्लेख केला आहे. वाराणसी येथे पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते बघा : ‘‘सरकार म्हणजे नीती (धोरण) आणि पक्ष म्हणजे रणनीती आणि या दोघांचा सुयोग्य ताळमेळ हा विजयाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे कारण असते.’’
 
मोदींबाबत बोलायचे झाले, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनप्रवासात ते, पक्षपाती मीडिया, मिळेल त्या मार्गाने त्यांच्यावर विषारी आघात, अनेक चौकशा, खोटे खटले इत्यादींच्याच सहवासात पुढे जात राहिले. बहुतेक इंग्रजी मीडियात त्यांना ‘एक नंबरचा खलनायक’ म्हणूनच रंगविले गेले. मोदींना फायद्याची ठरत असेल तर एखादी लोकशाही प्रक्रियाही उलथून पाडण्यास या मीडियाने मागेपुढे पाहिले नाही. (2002 साली, एका इंग्रजी दैनिकाच्या संपादकाने गुजरातच्या विधानसभा निवडणुका बेमुदत पुढे ढकलण्याची शिफारस केली होती). 2007 साली एका संपादकाने गुजरातच्या निवडणुकीला ‘‘हं, असे तर कुणी येर्‍यागबाळ्याही निवडून येऊ शकतो,’’ असे म्हणून मोदींच्या विजयाला कमी लेखले होते.
 
नरेंद्र मोदी यांनी या सर्व धमक्यांना आणि आघातांना ‘अनुभवामध्ये’ परिवर्तित केले आणि केवळ पक्षात िंकवा राष्ट्रीय परिप्रेक्ष्यातच नाही, तर सर्वसामान्य भारतीयांच्या हृदयातही ते आपले स्थान मजबूत करत गेले. या निवडणुकीचे निकाल सर्वांसमोर उघड आहेत. आता भारतीय राजकारणात भाजपा हा एक ध्रुव झाला आहे आणि नजीकच्या भविष्यात तरी त्याला आव्हान देईल असा कुठलाही राजकीय पक्ष आसपास दिसत नाही. म्हणून राजकीय विश्लेषकांना आमचा विनम्र सल्ला आहे की, भविष्यातील राजकारणाचे भाकीत करण्याआधी उपरोक्त सर्व गोष्टी ध्यानात घेण्यात याव्या.
(देवेंद्र कुमार हे राजकीय विश्लेषक व भाजपा सदस्य आहेत.
- विजय चौथाईवाले भाजपाच्या परराष्ट्र व्यवहार प्रकोष्ठाचे संयोजक आहेत.)