आजच्या वृक्षारोपणातील धोके!

    दिनांक :23-Jun-2019
डॉ. विलास सावजी
07263-252350
 
पाऊस सुरू झाला की झाडे लावण्याची स्पर्धा सुरू होते. झाड लावले की वनविभागाकडे नोंद करावी. झाडे जगावित यासाठी वनविभागाने व संबंधितांनी स्पर्धा ठेवावी.
याशिवाय नर्सरीमध्ये 5 ते 10 फूट उंचीची मोठी झाडेसुद्धा उपलब्ध करून द्यावयास हवी. उघडता येणार्‍या खोक्यांमध्ये मोठी झाडे लावावीत व मोठ्या दोन ते तीन वर्षांच्या झाडांचे वृक्षारोपण करावे.

 
सदोष वृक्षारोपण
आजचे वृक्षारोपण आत्मघातकी आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणार्‍या झाडांचे आहे.
1) गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली, तरी ती सुगंधी नाहीत. पूजा, हार यांच्या उपयोगाची नाहीत. या झाडाचे आयुष्यही 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त नसल्यामुळे झाडांचा दूरगामी कोणताच फायदा यात मिळत नाही.
2) निलगिरी हे झाड ऑस्ट्रेलियातून 1952 साली आयात केलेल्या गव्हाबरोबर आलेले आहे. मूळ निलगिरी झाडांच्या पानांचा जो सुगंध व डोकेदुखी थांबविण्यासाठी वापरला जातो, तसा या झाडात नसून हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामत: जलस्रोत शुष्क होण्यास या झाडाचा मुख्य परिणाम होतो. झाडाला चांगली दाट सावलीसुद्धा नसल्याने फार फायदेशीर असे हे झाड नाही.
3) अमेरिकन बाभूळ, 4) पेट्रोफोरम, 5) अकोशिया, 6) स्पार्थेडिया, 7) कॅशिया, 8) ग्लिरीसीडिया, 9) फायकस, 10) सप्तपर्णी, 11) रेन ट्री व अन्य इतरही झाडे आपल्या येथील नर्सरीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढविलेली दुर्दैवाने आज आपणास दिसतात.
या झाडांच्या आम्लयुक्त पानामुळे, या झाडांच्या आसपासची जमीन नापीक झालेली जाणवते, गाजरगवत नावाच्या तणाने प्रचंड क्षेत्र व्यापलेले दिसते. ही झाडे स्थानिक नसून बाहेरची आहेत. स्थानिक कीटक ही झाडे खात नाहीत.
वरील सर्व परदेशी झाडे अन्य झाडांच्या तुलनेत जमिनीतील आर्द्रता 15 टक्के शोषून घेतात. जमीन निकृष्ट होते. पक्षी या झाडांवर घरटी बांधत नाहीत. माकड िंकवा इतर प्राणी या झाडांच्या आसर्‍याने राहात नाहीत.
12) ग्लिरीसीडिया या झाडाच्या फांदीवरून उंदीर, घुशी फिरल्या तर त्या लगेच अपंग होतात व काही दिवसांत मरतात. अन्य प्राणी या झाडांच्या सावलीत बसले तर त्यांना धाप लागते. कारण या झाडातून विषारी वायू कायमस्वरूपी उत्सर्जित होत असतो.
13) फायकस या झाडाच्या पानांचा धूर श्वासावाटे शरीरात गेल्यास शरीराला सूज येते. ही झाडे भरपूर ऑक्सीजन घेतात व 24 तास घातक वायू सोडतात.
साधरणत: 70 टक्के सरकारी जंगलात व नर्सरीमध्ये अशाच झाडांचा भरणा आहे. 1970 पासून वरील झाडांचे वृक्षारोपण सपाटून होत आहे. परिणामत: फिरावयास जाणार्‍या नागरिकांमध्ये या भागात श्वासोच्छ्‌वासावाटे हे विष शरीरात जाऊन हार्टअटॅकचे प्रमाण वाढले आहे.
वेद व पुराणातील झाडे
एका संस्कृत श्लोकानुसार 1)पिंपळ, 2) कडुनिंब, 3) चिंच, 4) कवठ, 5) बेल, 6) आवळा, 7) जांभूळ, 8) चिकू, 9) बोर, 10) उंबर, 11) नांद्रक, 12) सीताफळ, 13) रामफळ, 14) आंबा ही झाडे जो लावेल त्याला नरकात कधीच जावे लागणार नाही व नरकयातनाही कधीच सहन कराव्या लागणार नाही.
 
देशी वृक्ष आपल्या परसात पर्यावरणाचा समतोल तर साधतातच व विविध आरोग्यवर्धक फळेही या वक्षापासून आपणास मिळतात. याशिवाय या झाडांच्या पानांचे खतही होते. या झाडांपासून प्राणवायू मोठ्या प्रमाणावर मिळतो व पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी आवश्यक असा गारवासुद्धा निर्माण करण्याची क्षमता या झाडांमध्ये असते.
 
लोकांना वाटते की तीन वर्षांत झाड लगेच मोठे झाले पाहिजे व त्यासोबत माझा फोटो वर्तमानपत्रात छापून आला पाहिजे. अशी घाई न करता शाश्वत अशी 5 ते 10 वर्षांत वाढणारी अन- 50 ते 70 वर्षे जगणारी अशी झाडे का निर्माण करण्यात येऊ नयेत? एका पिढीनं दुसर्‍या पिढीस झाडे हस्तांतरित करता येणे, हाच खरा आजच्या वृक्षारोपणाचा संदेश आहे.
 
नकली व अल्पायुषी झाडे काढून टाका. त्यांच्या आजूबाजूची जी माती प्रदूषित झाली ती बदलून टाका व बहुगुणी बहुपयोगी अशी झाडे लावा. तरच त्या वृक्षारोपणाची खरी यशस्विता दिसेल व समाधान मिळेल.
झाडे फार उंच असू नये, असे वनस्पतिशास्त्राच्या काही अभ्यासकांचे मत आहे. झाड उंच वाढू न देता ते टुमदार कसे होईल, याकडे विशेष लक्ष द्यावयास पाहिजे.
 
फळझाडे व फुलझाडांची जास्तीत जास्त निर्मिती केल्याने अनेक प्रश्न अगदी अलगद सुटले आहेत, असाही अनुभव आहे. प्रत्येक झाड विशिष्ट उद्देशाने लावले गेले असले पाहिजे. उद्देशपूर्ती साठी अशा झाडांच्या संवर्धनासाठी खास व्हावे.
 
बर्‍याच ठिकाणी वृक्षारोपण यशस्वी होण्यासाठी ड्रिप सिस्टीमचा उपयोग केला जातो किंवा मातीच्या जुन्या माठांचाही मुळा जवळ गाडूनच्या उपयोग केला जातो. या सर्व बाबींचा परिणाम असा की, अत्यंत कमी पाण्यामध्ये झाडांची शीघ्रगतीने वाढ करता येते. याशिवाय झाडांच्या खताची व्यवस्थाही अशा माठातून केली जाते.
 
सहेतुक वृक्षारोपण करा. कुणासाठी तरी किंवा एखाद्या आदेशामुळे वृक्षारोपण न करता ही काळाची गरज आहे, असे समजून यंदाच्या पावसाळ्यापासून वृक्षारोपण करावे, असे वाटते.