घटस्फोटित पतीपासून पत्नीला हवे अपत्य कौटुंबिक न्यायालयात अनोखी याचिका

    दिनांक :23-Jun-2019
मुंबई: मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात नुकतेच एक अनोखे प्रकरण दाखल झाले आहे. एका 35 वर्षीय महिलेने आपल्या घटस्फोटित पतीपासून अपत्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. पतीसोबतच्या सहवासातून किंवा  आयव्हीएफ (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन)च्या माध्यमातून आपल्याला अपत्य प्राप्त व्हावे, अशी विनंती तिने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने तिची भूमिका मान्य केली आहे.
 
 
 
2017 साली या महिलेचा घटस्फोट झाला आहे. मात्र, तिला आता दुसरे अपत्य हवे असल्याने, तिने न्यायालयात दाद मागितली आहे. मूल जन्माला घालायचे वय निघून जाण्याआधी तिला दुसरे मूल हवे आहे. ते नैसर्गिक रीत्या किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञानाने मिळावे, अशी तिची विनंती आहे. दुसरीकडे पतीने तिच्या या मागणीला नकार दिला आहे. आमचा घटस्फोट झाला असल्याने, तिची मागणी अवैध असून सामाजिक नियमांना अनुसरून नाही, असे तिच्या पतीचे म्हणणे आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. स्वाती चौहान यांनी, या महिलेच्या याचिकेवर निकाल देताना, व्यक्तिगत स्वायत्तता आणि प्रजननाचा अधिकार यावरील आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचा हवाला दिला. मानवी अधिकार कदापि नाकारता येणार नाही, असे आमचे स्पष्ट मत असल्याचे नमूद करताना, न्यायालयाने या दाम्पत्याला 24 जून रोजी विवाह समुपदेशकांचा सल्ला घेण्याचे निर्देश दिले आणि याच महिन्याच्या अखेरपर्यंत आयव्हीएफ तज्ज्ञांची बैठक निश्चित करण्यास सांगितले.
प्रजनन हा एका स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे. मूल जन्माला घालणे हा तिचा मूलभूत अधिकार आहे. अर्थात्‌ हा निर्णय घेण्यासाठी महिलेच्या पतीची संमती आवश्यक असल्याचेही न्यायालयाचे म्हणणे आहे. त्याची संमती नसेल तर पुढील कायदेशीर प्रक्रियांसाठी त्याला तयार राहावे लागेल. हा प्रश्न कायदेशीर मार्गापेक्षा वैद्यकीय मार्गाने सोडविला जाऊ शकतो, असे न्या. चौहान यांनी स्पष्ट केले.