भरधाव कंटेनरची बोलेरोला धडक; वाहनातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू

    दिनांक :23-Jun-2019
 

 
 
मेहकर: सिमेंटची वाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने बोलेरो वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत वाहनातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात काल 22 च्या रात्री दीडच्या सुमारास मेहकर डोनगाव रस्त्यावरील अंजनी बु. येथील राज धाब्या जवळ घडला.  मृतक हे सर्व औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. अधिक माहिती अशी की, सिडको औरंगाबाद येथील रहिवासी मनोहर हरिभाऊ क्षीरसागर वय 67  नलिनी मनोहर क्षीरसागर वय 65 व त्यांची मुलगी मेघा मनोहर क्षीरसागर वय 35 वर्ष हे चालक गजानन सुखदेव नागरे राहणार कन्नड ह. मु. औरंगाबाद यांच्यासोबत एम एच-20 ई ई -67 46 या बोलेरो वाहनाने नागपूर मधील सोनेगाव येथील एच. बी. ईस्टेट येथे राहणाऱ्या त्यांची मुलगी मनाली राहुल वालगोटवारला भेटून औरंगाबाद येथे परत जात असताना अंजनी बु. येथे समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम.एच -26 एडी -3541 ने जोरदार धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, बोलोरे समोरील भाग अक्षरशः चक्काचूर होऊन वाहनातील चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच मेहकर व डोणगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने अंजनी बु. येथील नागरिक व दोन जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.