आई नव्हेस तू वैरिणी ; जिवंत नवजात शिशुला फेकले कचऱ्यात

    दिनांक :23-Jun-2019
गोंदिया: जिवंत नवजात शिशुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकल्याची घटना रविवारी २३ जून रोजी सकाळी देवरी तालुक्यातील डवकी येथे उघडकीस आली. सरपंच व गावकऱ्यांनी या नवजात शिशुला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले असून त्याचेवर उपचार सुरू आहे. तर सदर नवजात शिशु सुखरुप असल्याची माहिती आहे.
 
 
 
 
डवकी येथील सरपंच उमराव बावणकर हे नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे फिरायला जात असताना, सिध्दार्थ हायस्कूलच्या जवळील रस्त्याच्या कडेवर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्यांना नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ  जावून पाहिले असता एक नवजात जिवंत शिशु त्यांना तिथे आढळून आले. त्यांनी लगेच याची माहिती गावकऱ्यांना  दिली. त्यानंतर त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या नवजात शिशुचा जन्म शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला असावा अस प्राथमीक अंदाज आहे. नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून जाणारी आई कोण याचा शोध गावकरी व पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे रात्रभर हा नवजात शिशु कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पडून होता. तो जिवंत असून डवकीवासीयांच्या मदतीने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.