पेरते व्हा... अर्थात पाऊस आला तर!

    दिनांक :23-Jun-2019
आता मान्सून सगळीकडे लवकरच दाखल होणार आहे, अशा बातम्या येतात नि थोडी चीडचीड कमी होते. सकाळी ढगाळ वातावरण असते नि मग आज नक्कीच येणार पाऊस, असे आपण सांगतो ठामपणे, कारण आपल्या घरी येणार्‍या वर्तमानपत्रांत तशी बातमी आलेली असते. मात्र थोड्याच वेळात ऊन्हं दाखल होतात अन्‌ मग घरी आलेले वर्तमानपत्र ‘रद्दी’ झालेले असते. वाईट निकाल लागल्यावर गावभर उनाडत राहणारा पोरगा बाप आता घरी नक्कीच नसेल म्हणून भुकेच्या वेळी घरी येतोच. तसा आता हा पाऊसही कधीतरी पडणारच. किमान रजिस्टरवर हजेरीची सही मारायला सरकारी कर्मचारी जसे ऑफिसला जातात तसा हा पाऊसही नक्कीच येणार. त्यानंतर पेरण्या सुरू होतीलच. शेतकरीही दुसरे काही करूच शकत नाही. उशिरा येणार्‍या बाबूला शिव्या मारणारे लोक बाबू आल्यावर आधी आपले काम करून घेण्यासाठी त्याच्याशी लाडीगोडीच करतात, तसेच शेतकरीही पावसाला कितीही शिव्या घातल्या तरी तो आल्यावर आधी पेरण्या आटोपतात. तर आता पेरण्या सुरू होतीलच लवकरच...
 
 
 
‘पेरील जे शेतकरी न काही, तै खावया मिळणार नाही...’ असे कुण्या संताने म्हणून ठेवलेच असावे. (नसेल तर आम्हालाच संत समजून हे गोड करून घ्यावे.) आता एकदा संत झाल्यावर आपले ज्ञान पाजळण्याची संधी आयतीच मिळालेली आहे. त्याचा सहर्ष लाभ करून घेत ते करून घ्यायचे म्हणतो-
भारतातील किंवा जगातील शेतीची सुरवात स्त्रियांनीच केली आहे, हे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. तसेही सृजन व स्त्री हे जितके स्वाभाविक तितकेच अभिन्नदेखील आहे. शिकारीच्या मागावर गेलेल्या पुरुषांच्या माघारी स्त्रियांनी त्यांच्या अचाट निरीक्षणशक्तीच्या जोरावर काही गवतं पिकवून पाहिली. ती टिकवली, साठवली व संवर्धितही केली. अर्थात, हेही तिच्या स्वभावानुसार स्वाभाविकच होतं. शेवटी आपल्या उदरातून आलेल्या व वाढीला लागलेल्या पिढ्यांना चांगलं खाऊ घालायची तिची अंतःप्रेरणा तिला स्वस्थ बसू देणार नव्हती. पुरातन काळात नैऋतीचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. शेती व्यवसायात पुढे असणार्‍या स्त्रियांच्या गटाची ती प्रमुख होती. प्रबळ होतं गेलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीपुढे ती हळूहळू मागे पडत जाऊन पुढे तर निष्प्रभ झाली, असेच म्हणावे लागेल.
मुळात शेतीची सुरुवातच स्त्रियांनी केली. पुरुष शिकार करायचे अन्‌ स्त्रिया शेती... त्यांनी बियाणं जतन केलं. त्यात संशोधक वृत्ती जपली. वाणं वाढवली. आपणही नेहमी ही चर्चा करत असतो. अनेक शेतकरी सांगतात की, त्यांची आई, आज्जी बियाणं जपून ठेवायच्या. महाराष्ट्रात जुन्या काळात ज्वारी आणि इतर धान्याची बीजं स्त्रियाच राखून ठेवायच्या. पूर्ण देशात असेच चित्र होते.
मेघालयात स्त्रियांनी तांदळाची असंख्य वाणं सांभाळून ठेवली व ती दरवर्षी वृिंद्धगत केली. महाराष्ट्रात स्त्रिया श्रम करण्यात व शेतीत पीक पद्धती ठरवण्यात अग्रेसर होत्या. सगळे सण कृषिचक्राच्या भोवती फिरतात. स्त्रियांनी किती कलात्मकतेने हे सण शेतीसोबत गुंफले आहेत. प्रसन्न व टवटवीत ठेवले आहेत. नागपंचमीला साळीच्या लाह्या, झोके, गाणी, मेंदी अन्‌ काय न काय... नवरात्रात नवधान्यांची उगवण क्षमतेची चाचणी, तीदेखील स्त्रीत्वाची पूजा करूनच केली जायची. बिहू, पोंगल, लाहेडी, संक्रांती, धनतेरस ही अशीच काही उदाहरणं. आंध्रप्रदेशात, चेन्नकोटापल्ली येथे वैशाख पौर्णिमेला असाच एक पारंपरिक बीज उत्सव होतो. तिथे धानासोबतच इतर डाळी, कडधान्ये, तेलबिया, भाज्या अशी नवधान्ये एका कलशात घेऊन तरुणी मंदिरात जातात, पूजन करून त्यांना अंकुरण्यासाठी नदीकाठी लावतात. सकस व दमदार बियाणे निवडायची किती छान पद्धत आहे!
छत्तीसगढमध्ये तर 21 प्रकारची धान्यं रात्रभर भिजत ठेवून त्यांच्या अंकुरण्याच्या प्रमाणावरून त्या वर्षीची पीक पद्धती ठरवली जाते. अर्थात, इथेही पूजन आलंच. आपल्या इथे धान रोवणीला किंवा कापूस पेरायच्या आधी सीतामाईची पूजा केली जाते. धान्य शिवारात फेकून, नारळ वाढवून सीतामाईला खुश केले जाते. काही ठिकाणी तर तिला अंड्याचा नैवेद्य दाखवला जातो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, प्रत्येक प्रसंगी बिजाई स्थानिक व पारंपरिक वापरली गेली आहे. हे बीजस्वराज्य असेल तेव्हाच निर्णयस्वराज्यपण येत असतं. बियाणं जतन करणे वा एकमेकांना पुरवणे, हेच आतापर्यंत होत आले आहे. बीजस्वराज्य हा या कृषी संस्कृतीचा पाया आहे. परावलंबी समाज संस्कृती निर्माण करू शकत नाही. विदर्भ-मराठवाड्यांत गहू जेव्हा जास्त खाल्ला जात नव्हता तेव्हा इतर धान्यांची रेलचेल होती. ज्वारी, बाजरी, कुळीथ, नाचणी, कोदो, कुटकी, कोसरा, वरई (भगर), तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, वाटाणा, मसूर, लाखोळी, राजमा, वाल, धान, शेंगदाणे, तीळ, जवस, मोहरी, इ. इ. शेतीचे नियोजन कुटुंबाच्या गरजेनुसार ठरत असे.
आताचे नियोजन मार्केट ठरवते. त्यामुळे कितीही मोठे शेतीचे क्षेत्र असले तरी कोणी नुसता संत्रा पिकवतो, तर कोणी नुसता सोयाबीन. कुठे नुसता कापूस, तूर, तर कुठे नुसतीच तूर. एखाद्दोन पिके काढणे बरेचदा नुकसानीचे ठरते. एखादा रोग आला किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर पूर्ण पीक हातचे जायची भीती असते. परत मार्केट भाव ठरवत असल्यामुळे नफा होईलच, याचीही शाश्वती राहात नाही. याही उपर प्रत्येक गोष्ट जसे की तेल, मीठ, डाळी, भाज्या यासाठी मार्केटवरच अवलंबून राहावे लागते. आज शेतकर्‍यांकडे बियाणे उपलब्ध आहे का? आता खते आणि बियाणे याबाबत शेतकरी जसा पावसावर अवलंबून असतो तसा बाजारावर अवलंबून असतो.
अशा प्रकारे शेतकरी दिवसेंदिवस लाचार व दरिद्री होत गेला. सुधारित वाण, त्याला लागणारी खतं, कीटकनाशकं याच्या दुष्टचक्रात अडकत गेला. तसाही गावगाड्यात सगळ्या बाजूने नाडला जायचा तो शेतकरीच! ‘गावगाडा’ या दीडशे वर्षं जुन्या पुस्तकात आत्रे लिहितात, ‘कुणबीका और आटा, पिटा उतना मीठा’, पण आता तर परिस्थिती त्याही पलीकडे गेली आहे. पोटासाठी शेती ते बाजारासाठी शेती हा मोठा बदल या उद्योगात घडून आला आहे.
आता पेरणीचा हंगाम समोर आहे. हरितक्रांतीनंतर जे झाले ते झाले. पण, यापुढे तरी एकसुरी लागवड करणार्‍या शेतकर्‍यांनी घरच्या गरज डोळ्यासमोर ठेवून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकायला पाहिजे. 10 एकर शेती असेल तर निदान त्यातली किमान 1 एकर घरच्यासाठी कडधान्ये, तेलबिया, भाज्या यासाठी राखीव ठेवायचा संकल्प केला पाहिजे. त्यात विष जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना पारंपरिक, सुदृढ बियाणे जपायला हवीत. आपल्याच परिसरात कुणाकडे पारंपरिक बियाणे आहेत का, याचा शोध घेतला तर कदाचित सापडूही शकेल. पेराल तेच उगवेल, हे लक्षांत ठेवायला हवे. तुम्ही शेतात कार्पोरेट क्षेत्राला हवे तेच पेराल तर मरणच उगविणार हे नक्की! विदर्भातच नाही तर महाराष्ट्रातही अनेक कार्यकर्ते बीजसंगोपन आणि संकलनाचे काम करत आहेत. त्यांच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहिजे...