ICCWorldCup2019 : हॅटट्रीकनंतरही शमीला ‘सामनावीर’ पुरस्कार का नाही? नेटकऱ्यांची नाराजी

    दिनांक :23-Jun-2019
साऊदॅम्पटन,
भारतीय संघाने अफगाणिस्तानला ११ धावांनी पराभूत केले. विजयात महत्त्वाची भूमिका ठरली ती म्हणजे गोलंदाजांची. विश्वचषकातील भारताचा हा एकूण ५० वा विजय ठरला. भारताने 225 धावांच्या छोट्या लक्ष्याचाही उत्तमपणे बचाव केला. मात्र, या सामन्यातील एका घटनेची सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चा आहे. ती म्हणजे सामन्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सामनावीर पुरस्काराची. 

 
हॅटट्रीक घेऊन देखील सामनावीर पुरस्कार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला न मिळता जसप्रीत बुमराहला मिळाल्याने क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या. शमीने त्याच्या 9.5 षटकात 40 धावा देऊन 4 गडी बाद केले, तर बुमराहने 39 धावा देऊन केवळ दोन फलंदाज माघारी धाडले. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी शमीवर अन्याय झाला असून तोच खरा मॅन ऑफ द मॅच होता असे म्हटले आहे.
 
 
मोहम्मद शमीने जरी हॅटट्रीक घेऊन एकूण चार विकेट घेतल्या तरी सामन्याचे चित्र पालटण्यामध्ये बुमराहची गोलंदाजी महत्त्वाची होती. एकवेळ अफगाणिस्तानचा संघ केवळ दोन गडी बाद 106 धावा अशा भक्कम स्थितीत होता. अशावेळेस विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीने बुमराहला दुसऱ्या स्पेलमध्ये बोलावून त्याच्याकडे चेंडू सोपवला. कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत बुमराहने अफगाणिस्तानला हादरवून सोडले.
 
 
 
त्याने खेळपट्टीवर जम बसलेल्या अफगाणिस्तानच्या दोन्ही फलंदाजांना एकापाठोपाठ बाद केले. सर्वप्रथम रमहत शाह याला उसळत्या चेंडूवर आणि दोन चेंडूनंतर हश्मतुल्लाह शाहिदी यालाही बाद केलं आणि सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. सामनावीर पुरस्कार देताना शक्यतो सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळाडूचा विचार केला जातो.
 
 
 
बुमराहने एकाच षटकात दोन हादरे दिल्यानंतर पुन्हा अफगाणिस्तान संघाची फलंदाजी सावरू शकली नाही, त्यांचा एकही फलंदाज मैदानावर तग धरु शकला नाही. याशिवाय 49 व्या षटकात 12 चेंडूंमध्ये 21 धावा आवश्यक असताना बुमराहने केवळ 5 धावा दिल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात शमीने शानदार हॅटट्रीक नोंदवत भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केलं. बुमराहने 10 षटकांमध्ये केवळ 39 धावा दिल्या, संपूर्ण सामन्यात त्याने एकही अवांतर धाव दिली नाही. सामन्याला कलाटणी देणाऱ्या याच कामगिरीमुळे बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्थात यामुळे शमीने घेतलेल्या हॅटट्रिकचे महत्त्वही अजिबात कमी होत नाही हे देखील क्रीडाप्रेमींनी समजून घेण्याची गरज आहे.