ब्राह्मण समाजाने आपली व्यापकता टिकवावी- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

    दिनांक :24-Jun-2019
पिंपरी: ब्राहमण समाजाने आजपर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन वाटचाल केली आहे. यावरूनच ब्राहमण समाजाची व्यापकता दिसून येते. हीच व्यापक विचारसरणी यापुढे देखील टिकवून ठेवावी असे मत माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. राज्यातील पंधरा आमदारांना ब्रह्मकेसरी सांस्कृतिक पत्रिकेच्या वतीने 'उत्कृष्ट विधायक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले त्यावेळी सत्काराला उत्तर देताना थोरात बोलत होते.
 
 
 
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रविवारी (दि. २३) संध्याकाळी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकेसरीचे संपादक गोविंद कुलकर्णी होते. यावेळी ब्रह्मकेसरीचे मुख्य संपादक पं. वसंतराव गाडगीळ, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ उद्योजक श्रीकांत बडवे, बडोद्याचे आमदार शैलेशभाई मेहता, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, नगरसेवक रवी लांडगे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष तिवारी, निवड समितीचे अध्यक्ष विवेक इनामदार, ब्रह्मकेसरी संपादकीय मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया बडवे, राष्ट्रीय सरचिटणीस सुब्रमण्यम शर्मा, ब्रह्मकेसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिराळकर आदी उपस्थित होते.
पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (संगमनेर), उदय सामंत (रत्नागिरी), महेश लांडगे (भोसरी), राहुल पाटील (परभणी), सीमा हिरे (नाशिक), गोवर्धन शर्मा (अकोला), सुधीर गाडगीळ (सांगली), संगीता ठोंबरे (केज), राहुल कुल (दौंड), हर्षवर्धन जाधव (कन्नड) या आमदारांना 'उत्कृष्ट विधायक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, " ब्राह्मण समाजात समाज सुधारक, थोर विचारवंत होऊन गेले. त्यांनी कोणताही जातीभेद न मानता सर्व समाजाला बरोबर घेऊन वाटचाल केली आहे. यावरूनच ब्राहमण समाजाची व्यापकता दिसून येते. ही व्यापकता येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मण समाजाने टिकवून ठेवावी. समाजात अशी अनेक माणसे आहेत. त्यांची कामे खरोखरच चांगली आहे. त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करावे" अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पं वसंतराव गाडगीळ म्हणाले, "संस्कृत ही सर्व भाषांची जननी, भाषासम्राज्ञी आहे. ही भाषा कधीही लोप पावणार नाही. वसुधैव कुटुंबकं ही ब्रह्मन् समाजाची विचारसरणी आहे. ही विचारसरणी कुणाला परके मानत नाही. अखंड भारतासाठी आपणा सर्वांचे विचार, ध्येय एकच असले पाहिजे"
ब्रह्मकेसरीचे संपादक गोविंद कुलकर्णी म्हणाले, "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ देशाकरिता काम करणारा संघ आहे. देश सक्षम व सुजलाम सुफलाम घडविण्यासाठी महासंघ कायम तत्पर राहील" यावेळी महापौर राहुल जाधव, सुप्रिया बडवे, शैलेशभाई मेहता, सुभाष तिवारी, सुब्रमण्यम शर्मा आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मोहिनी पत्की यांनी केले. सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी यांनी केले. जितेंद्र कुलकर्णी यांनी स्वागत केले. आभार केतकी कुलकर्णी यांनी मानले.