ग्रामीण पोलिसांनी राजस्थानातून केली अल्पवयीन युवतीची सुटका

    दिनांक :24-Jun-2019
लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार
 दोन युवकांवर गुन्हा
अकोट- तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन युवतीला(वय-१७) लग्नाचे आमिष देऊन फुस लावून पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन युवकांवर ग्रामीण पोलिसांनी थेट राजस्थानात जाऊन धाडसी कारवाई करत त्या युवतीची सुटका केली.ही युवती मैत्रिणीसोबत अकोट शहरात संगणकाच्या वर्गाला जाते असे तिच्या पालकांना सांगून गायब झाली होती. विशेष म्हणजे युवतीवर अत्याचार करणारा एक नवयुवक सुध्दा अल्पवयीन असून(वय-१७)पोलिसांनी दुसऱ्या सज्ञान युवकाला अटक केली आहे.
 
 
 
ग्रामीण पोलिसांपूढे अल्पवयीन युवतीचा शोध लावणे मोठे आव्हान होते.पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांच्या चमूने नियोजनपूर्ण सखोल तपास करुन अखेर राजस्थानातील उदयपूरजवळ युवतीचा शोध लावला.त्यांच्या ग्रामीण ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शोध घेत एका घरी छापा टाकून युवती व दोन युवकांना ताब्यात घेऊन महाराष्ट्रात अकोटला २२ जूनला आणले.सुरुवातीला पोलिसांना हे तिघे गुजराथ मधील वापी येथे असल्याची सुध्दा माहिती मिळाली होती.राजस्थानात अल्पवयीन युवतीवर लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन युवकाने अत्याचार केले व त्यांच्या सोबत असलेला सज्ञान युवक रविंद्र झगडे (वय-२३) याने सहकार्य केले.पोलिसांनी दोन्ही युवकांविरुध्द ग्रामीण ठाण्यात १६ जूनलाच भादंविच्या कलम ३६६ अ,३७६(२)एन,तसेच सहकलम ३अ,४अ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून आरोपी रविंद्र झगडेला अटक केली आहे.या गंभीर प्रकरणानंतर अल्पवयीन पिडीत युवती व विधीसंघर्षग्रस्त युवकाला कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कार्यवाही पोलिस अधिक्षक कलासागर,अतिरिक्त अधिक्षक विक्रांत देशमुख,उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ज्ञानोबा फड,उपनिरिक्षक सुवर्णा गोसावी,नारायण वाडेकर,गजानन भगत,अनिल शिरसाट,प्रविण गवळी,नंदकिशोर कुलट आदींनी केली.