अमेरिकेच्या संरक्षण धोरणावर चर्चा करणार मोदी, शी, पुतिन

    दिनांक :24-Jun-2019
-जी-20 परिषदेच्या अनुषंगाने होणार भेट
बीजिंग,
जपानमध्ये या आठवड्यात होणार्‍या जी-20 परिषदेच्या अनुषंगाने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत अमेरिकेच्या वस्तुस्थितीला धरून नसलेल्या आणि संरक्षणवादी व्यापार धोरणाला विरोध करण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची माहिती चीनच्या वरिष्ठ मंत्र्याने आज सोमवारी दिली.
 
 
 
डोनाल्ड ट्रम्प ‘अमेरिका फर्स्ट’धोरण राबवण्यासाठी व्यापार आणि करांचा वापर शस्त्राप्रमाणे करीत आहेत. त्यांच्या या धोरणाला सशक्त विरोध केला जावा, अशी मागणी चीन करीत आहे. अमेरिकेचे हे धोरण एकतर्फी आणि संरक्षणवादी आहे. या धोरणाविरोधात ब्राझिल, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांच्या आणि रशिया, चीन व भारत या देशांच्या नेत्यांत ओसाका येथे चर्चा केली जावी, अशी मागणी चीनने केली आहे.
 
जी-20 परिषद 28-29 जून रोजी ओसाका येथे होत आहे. या बैठकीच्या एक दिवसापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग येथे पोहोचणार आहेत. ते येथे अनौपचारिक बैठका घेणार असून, जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेले व्यापारयुद्ध संपवण्यासाठी ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत.
किर्गिजस्तानची राजधानी बिश्केक येथे अलीकडेच झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेत नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात चर्चा झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सध्याची परिस्थिती पाहता या तीनही नेत्यांची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चीन, रशिया आणि भारताचे संबंध वेगाने बळकट होत आहेत, असे या तीनही नेत्यांच्या बैठकीचे महत्त्व स्पष्ट करताना चीनचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री झँग जून यांनी सांगितले.