गुंतवणुकीत हवं सातत्य

    दिनांक :24-Jun-2019
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला आपण गुंतवणुकीचं नियोजन करतो. म्युच्युअल फंडाची सिप योजना सुरू करण्याचा विचार पक्का झालेला असतो. पब्लिक प्रॉव्हिडंट खातं सुरू करून गुंतवणुकीत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचंही ठरतं. मात्र आयकर विवरणपत्र भरायची वेळ आल्यावर या सगळ्या योजना कागदावर राहिल्याचं आपल्या लक्षात येतं. गुंतवणुकीच्या बाबतीत आपण सातत्य का जपू शकत नाही? मुख्य म्हणजे आपल्या सर्व योजना फक्त कागदावर का राहतात? मुळात आपण गुंतवणूक न करण्याची विविध कारणं शोधत राहतो किंवा गुंतवणुकीच्या योजना पुढे ढकलत राहतो. गुंतवणूक न करण्याच्या भारतीय मानसिकतेचा हा घेतलेला आढावा आणि या मानसिकतेतून बाहेर पडण्याचे काही उपाय - 
 
 
भारतीय गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे निर्धोक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मुदत ठेव आणि सोनं यांची निवड केली जाते. यात आपली मुद्दल सुरक्षित राहात असली तरी परताव्याच्या बाबतीत होणार्‍या नुकसानाचा विचार आपल्याकडून होत नाही. गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत शेअर बाजारातून अनेक पटींनी अधिक परतावा मिळतो. शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सातत्याने खूप चांगला परतावा दिलेला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची भीती वाटत असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा. धोक्यांची विभागणी केल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील.
 
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येकाला झटपट श्रीमंत व्हायचं असतं. मात्र संपत्ती वाढण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. शेअर बाजारात भरारी घेण्याआधी स्वत:च्या आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा.
 
शेअर बाजाराच्या प्रक्रियेकडे लक्ष देण्याइतका वेळ आपल्याकडे नसल्याचं कारण अनेक जण देतात. अशा परिस्थितीत आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. गुंतवणूक करण्याइतके आपण श्रीमंत नसल्याचंही अनेक जण सांगतात. मात्र अगदी कमी रक्कम गुंतवूनही तुम्ही सुरूवात करू शकता. कमी वयात गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचे लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीच्या प्रक्रियेत वेळ सर्वात महत्त्वाचा असतो हे कायम लक्षात ठेवा.