चेन्नईत रुजू होण्यासाठी गेले, लहान तोंड करून परतले !

    दिनांक :24-Jun-2019
बा. दे. अभियांत्रिकीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूमध्ये फसवणूक
 
प्रफुल्ल व्यास
 
वर्धा: आमच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यास देशातील नामांकित कम्पनीत नोकरी लागत असल्याची जाहिरात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातुन केली जाते. सेवाग्राम येथील बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी कॉलेजमध्येही असेच प्रलोभन दिले गेले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या कॉम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेले ५ विद्यार्थी चेन्नई येथे रुजू व्हायला गेले. परन्तु, त्या कम्पनिकडे या विद्यार्थ्याविषयीची कोणत्याही प्रकारची माहितीच नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच नोकरी मिळाल्याच्या आनंदाने गेलेले युवक लहान तोंड करून परत आले.
 
 
भुगाव येथील सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेल्या अडचणीनंतर अनेक विद्यार्थ्यांना सेवाग्राम येथील बापुरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला.  बा. दे. अभियांत्रिकी विद्यालयात फेब्रुवारी महिन्यात कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. त्यात याच महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांची चेन्नई येथील के. के. प्रेशशन या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना १३ हजार वेतन, राहण्याची आणि एकवेळ जेवणाची व्यवस्था अशी सुविधा कंपनीकडून देण्यात येईल असे, कन्सल्टन्सी मार्फत इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर सांगण्यात आले होते. याच इंटरव्ह्यूच्या वेळी कन्सल्टन्सी मार्फत एका महिलेने ऑनलाइन (मोबाइलवरून) इंटरव्ह्यू पण घेतला होता. ऑफरलेटरनुसार निवड झालेल्या ७ पैकी ५ मुलं चेन्नई येथे रुजू होण्यासाठी गेले असता या सर्वाचा भ्रमनिरास झाला. मल्टिनॅशनल कम्पनीत नोकरी लागल्याचा आनंदावर तर चेन्नईच्या के. के. प्रेसेशन या कंपनीच्या आवारात पाय ठेवताच विरजण पडले. विशेष म्हणजे ज्या कंपनीमध्ये ५ बेरोजगार रुजू होण्यासाठी गेले त्या कंपनीकडे या मुलांची कोणतीही माहिती नव्हती. मुलांनी कंपनीच्या व्यवस्थापक सर्वनाम यांच्याशी संपर्क साधून ऑफरलेटर दाखवल्यानंतर त्यांनी थोडी नरमाइची भूमिका घेतली. परन्तु, या मुलांच्या राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने आमच्याकडे सुविधा नसल्याने तुम्ही बाहेर व्यवस्था करा आम्ही तुम्हाला ५ हजार देऊ असे व्यवस्थावक सर्वनाम यांनी सांगितले. त्यानंतर पाचही मुलं रोज सर्वनाम यांच्या सम्पर्क करत होते. पण, कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. कॉलेजसोबत संपर्क केल्यास दोन तीन दिवस थांबा तुमची व्यवस्था होईल, असा धीर देण्यात येत होता. अखेर, व्यवस्थापक सर्वनाम याचा फोन कायम बंद येत असल्याने सर्वच बेरोजगार युवकांनी वर्धेला परत येण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात बा. दे. अभियांत्रिकीचे प्राध्यापक नितीन चोरे यांच्यासोबत संपर्क साधला असता इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडम सुट्टीवर असल्याने गोंधळ झाला असल्याचे त्यांचे त्यांनी सांगितले तर आशिष ठाकरे यांनी या प्रकारात कन्सल्टन्सी जबाबदार आहे. कॉलेज कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे सांगितले. त्या मुलांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना कन्सल्टन्सी कडून नुकसान भरपाई मिळवून देऊ, त्यांनी न दिल्यास कॉलेज देईल, असे ठाकरे यांनी सांगितले. एवढेच नव्हेतर ज्या मुलाची नियुक्ती झाली होती त्यांना पुन्हा त्याच कंपनीत रुजू करून देऊ, सोबत कर्मचारी पाठविण्यात येईल असेही ठाकरे यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.
फसवा फसवी
बी इ ची डिग्री हाती येण्यापूर्वीच नोकरी मिळत असल्याचा आनंद असल्याने फेब्रुवारीमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कन्सल्टंट म्हणून आलेल्यांना संबंधित कंपनीत भविष्यात प्रमोशन होईल का? असा प्रश्न विचारला असता मुलाखत घेणाऱ्यांनी हो म्हटले होते. मुलं जेव्हा कंपनीत गेले तेव्हा त्या कँपणीत मशीन ऑपरेटर्स नंतर थेट व्यवस्थापक हेच पद असल्याने आमचे प्रमोशन कसे होईल असा प्रश्नही या तरुणांना पडला होता. कन्सल्टन्सीकडून मात्र या युवकांची फसवणूक झाली हे मात्र तेवढेच सत्य!