घराच्या छतावरून पडून युवतीचा मृत्यू

    दिनांक :24-Jun-2019
सावली येथील घटना
 
देवरी: देवरी तालुक्यातील सावली येथील एका युवतीचा आपल्या घराच्या छतावरून पडून मृत्यू झाला. ही  घटना आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. मृत युवतीचे नाव दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे. दीक्षा ही काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली असल्याचे सांगण्यात येते. यावेळी छतावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर युवती ही व्यवसायाने इंजिनिअर असून ती नागपूरच्या एका खासगी कंपनी कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील युवकाशी झाला होता. या घटनेने सावली गावात शोककळा पसरली आहे.