वेस्ट इंडिजने विश्वचषकाला आयपीएल समजू नयेः चहल

    दिनांक :24-Jun-2019
मॅनचेस्टर,
वेस्ट इंडिज संघाने विश्वचषक स्पर्धेला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यांप्रमाणे समजू नये, असा सल्ला भारतीय संघातील फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल याने दिला आहे. विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चहल बोलत होता. 

 
आयपीएल स्पर्धेत आंद्रे रसेल हा चांगलाच फॉर्ममध्ये होता. मात्र, ही विश्वचषक स्पर्धा आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी वेगळी मानसिकता लागते. या सामन्यासाठी आम्ही योजना आखली आहे. आंद्रे रसेल आक्रमक फलंदाज असला, तरी त्याला आम्ही अनेकदा गोलंदाजी केली आहे, असे चहलने सांगितले.
देशासाठी खेळणं आणि आयपीएल खेळणं दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. सामना जिंकण्याचा दबाव दोन्ही संघांवर असणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल, तर भारतीय संघाचा कामगिरीतील सातत्यावर भर असेल, असेही चहल म्हणाला. पहिले चार फलंदाज बाद झाल्यानंतर रसेल मैदानात उतरतो. अशा परिस्थितीत कसा खेळ करावा, याचा रसेलला चांगला अनुभव आहे. मात्र, आम्ही त्यासाठी नक्कीच वेगळी योजना आखली जाईल, असे चहलने नमूद केले.
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल बोलताना चहल म्हणाला की, एकंदरीत परिस्थिती पाहता २७० पर्यंत धावसंख्या गाठणे अपेक्षित होते. केदार जाधवनेही संयमित फलंदाजी केली. परंतु, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे आमच्या ३० ते ४० धावा कमी झाल्या. कमी धावसंख्येचे सामने जिंकल्यामुळे एक आत्मविश्वास संघाला मिळाला, असे त्याने सांगितले.