घर पाडण्याच्या विरोधात मोहाड़ीत निघाला विराट मोर्चा

    दिनांक :24-Jun-2019
मोहाड़ी: सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घर पाडण्याच्या निषेधार्थ तथा त्यांना जमिनीचा पट्टा देण्यात यावा व दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्यासाठी नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी शनिवार पर्यंत मागण्यांच्या निकाल लावण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत शिवलाल लिल्हारे यांच्या मुलांचे उपोषण सुरूच राहणार आहे
 
 
 
जवळील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घर सरपंच व तहसीलदार यांनी संगनमत करून राजकीय द्वेषापोटी पाडले होते. हे प्रकरण जिल्ह्यात सध्या फार गाजत आहे. त्यांची दोन अल्पवयीन मुले पंधरा दिवसांपासून उपोषणावर बसलेली आहेत. त्यामुळे जनतेत रोष आहे. त्याचा प्रत्यय आज मोर्चामध्ये दिसून आला. नानाभाऊ पटोले, राजू कारेमोरे, पंकज कारेमोरे, आशिष पातरे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले असता प्र. उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून शिवलाल लिल्हारे यांना २९ जून पर्यंत पट्टा देण्याचे प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलन कर्ते नागरिक आजच निकाल द्या या मागणीवर ठाम होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण नानाभाऊ पटोले यांनी आंदोलन कर्ते नागरिकांची समजूत घालून शनिवार पर्यंत वाट बघण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा राग ओसरला. मोर्चात अंदाजे पाच हजार नागरिक उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधु यांनी पोलिसांचा तगड़ा चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चात माजी खासदार मधुकर कुकडे, राजू कारेमोरे, नरेश डाहरे, धनंजय दलाल, रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अनिल काळे, अरविंद येळने, नरेश ईश्वरकर, किरण अतकरी, राजेश हटवार, के के पंचबुद्धे, सुनील गिरेपुंजे, नाना पंचबुद्धे, अमर रगडे, प्रभू मोहतुरे, रिता हलमारे, मनीषा गायधने, मोहाडी च्या नगराध्यक्ष गीता बोकडे, शोभा बुरडे, कविता बावणे, वंदना मेश्राम, कमलेश कनोजे इत्यादी नेते उपस्थित होते.