कुठल्याही क्षणी मुंबईवर वरूणराजा बरसणार!

    दिनांक :24-Jun-2019
मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा आता कुठल्याही क्षणी संपणार आहे. गेल्या ४८ तासांमध्ये पावसानं दक्षिण भारतात जोर धरला असून तो निश्चित गतीनं पुढे सरकत आहे. कोकणामध्ये अलिबागजवळ पाऊस दाखल झाला असून तो कुठल्याही क्षणी मुंबईवर बरसेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. सगळी परिस्थिती पावसाला अनुकूल असून आता त्यात बाधा येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
 
 
पहिला आठवडा सरताना मुंबईत पाऊस धडकतो असा अनुभव असताना यंदा झालेल्या तब्बल १७ दिवसांच्या विलंबामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. जवळपास १५ दिवस पिछाडीवर असलेला पाऊस आधीची कसर मात्र भरून काढेल की नाही याबाबत साशंकता आहे. साधारणपणे मुंबईत एव्हाना मुसळधार पाऊस सुरू झालेला असतो. हलक्या सरींनी जरी एकदोनदा आगमन केलं असलं तरी अद्याप एक दिवसही मुसळधार पाऊस मुंबईत पडलेला नाही, ज्याची मुंबईकर आतुरतेनं वाट बघत आहेत.
 
 
परंतु हवामान खात्यानं जनजीवन उध्वस्त करणारा पाऊस सध्या तरी पडणार नाही असे सांगताना मात्र समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. काल रात्री राज्यात ठिकठिकाणी मध्यम, रिमझिम व दमदार पावसानं हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे.
  
मात्र, सोमवारी मुंबईत पाऊस नुसताच बरसणार नाही तर पुढील काही दिवसही पावसाची मुंबईवर कृपा राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे. २६ जून रोजी मुसळधार पावसाला सुरूवात होईल व नंतर काही दिवस मुंबईवर पावसाची चांगलीच बरसात होईल असा अंदाज आहे.
जूनमध्ये मुंबईमध्ये ४९३.१ मि.मि. पावसाचं लक्ष्य असतं, परंतु महिना संपत आला असताना आत्तापर्यंत किरकोळ पडलेल्या पावसामुळं अवघ्या १६५ मि.मि. इतक्याच पावसाटी नोंद झाली आहे. विलंब झालेला पाऊस जूनचं लक्ष्य गाठणार नाही असं दिसतंय, मात्र उशीरा का होईना पण पाऊस बरसणार अशी शक्यता दिसत आहे.