काशिद बीचमध्ये बुडून दोघांचा मृत्यू

    दिनांक :24-Jun-2019
रायगड: रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील काशिद येथे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या दोन जणांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. अभिषेक म्हात्रे आणि पुजा शेट्टी असे या दोघांची नावे आहेत. 
नावडे पनवेल येथे राहणारा अभिषेक म्हात्रे हे कोपरखैरणे येथील पुजा शेट्टी आणि रोहीणी कटारे यांच्या सोबत मुरुड येथील फार्म हाऊसवर आले होते. रविवारी सायंकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास काशिद बीच परीसरात समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक आणि पुजा हे दोघे बुडाले. दोघही बुडत असल्याचे लक्षात आल्याने रोहीणी यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्य सुरु केले. अभिषेक आणि पुजा यांना बाहेर काढून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यापुर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. मुरुड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.