...तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही - उदयनराजे भोसले

    दिनांक :24-Jun-2019
मुंबई : निवडणूक निकालानंतर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले सातत्याने करत आले आहे. एखाद्या विजयी उमेदवाराने ईव्हीएम प्रणालीवर आक्षेप घेण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. आता परत एकदा त्यांनी हा मुद्धा उचलून धरला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात बॅलेट पेपरच्या माध्यमातून फेरनिवडणूक घ्यावी. यानंतर निकालामध्ये फरक दिसला नाही तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही, असे आव्हान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईव्हीएम यंत्र सदोष असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, कुठलीही मशीन ही माणूसच तयार करतो. त्यामुळे ईव्हीएम यंत्र पूर्णपणे सदोष आहे, असे म्हणणे चुकीचे ठरले. माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचं काय घेऊन बसलातं? जर संगणक हॅक होऊ शकत असले तर ईव्हीएम यंत्र हॅक होईल, अशी शंका उपस्थित करण्यात काय गैर आहे, असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला सातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे आवाहन केले. सातारा लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या सहा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यात फरक आढळून आला होता. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान देतो की, साताऱ्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी असे ते म्हणाले.