विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

    दिनांक :24-Jun-2019
मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करताच माजी विरोधी पक्षनेते आणि आताचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वड्डेटीवार यांच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने ४८ पैकी केवळ १ जागा जिंकली असून ती जागा चंद्रपूरची आहे. चंद्रपूरचे असलेले वड्डेटीवार यांनी या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. स्वभावाने आक्रमक असलेले विजय वड्डेटीवार हे विधानसभेतही विविध मुद्यांवर आक्रमक असतात. त्यामुळे काँग्रेसने विखे यांच्यानंतर वड्डेटीवर यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी असे पत्र हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते.