तणाव संपवण्यासाठी चर्चा करा; सुरक्षा परिषदेची अमेरिका-इराणकडे मागणी

    दिनांक :25-Jun-2019
 
 
 
संयुक्त राष्ट्रे,
आखातातील तणाव संपवण्यासाठी चर्चा आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने अमेरिका आणि इराणकडे केली आङे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे निर्बंध लादल्यामुळे इराणने ही मागणी फेटाळली आहे.
 
कुवेतने तयार केलेल्या निवदेनाच्या मसुद्यात तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्याचा एकमताने निषेध करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, तसेच जागतिक ऊर्जा पुरवठ्याला हा एक मोठा धोका असल्याचे परिषदेच्या निवेदनात म्हटले आहे.
 
दोन तास चर्चा झाल्यानंतर केवळ इराणच नव्हे, तर सर्वच पक्षांनी लष्करी तणावापासून दूर राहावे, हे निवेदन देण्यास परिषद राजी झाली. इराणचे सर्वोच्च नेेत अय्यातुल्लाह अली खामेनी आणि आठ कमांडर्सना लक्ष्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लावलेल्या नवीन निर्बंधांनंतर जागतिक शक्तीने ही संयुक्त भूमिका घेतली आहे.
 
अमेरिकेच्या विनंतीनुसार सुरक्षा परिषदेची बंदद्वार बैठक झाली. मात्र, अमेरिकेसोबत चर्चा करावी अशी स्थिती आता राहिली नाही, असे संयुक्त राष्ट्रसंघातील इराणच्या राजदूताने पत्रकारांना सांगितले.
कुणी तुम्हाला धमकी देत असेल, तुम्हाला घाबरवत असेल, तर त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करू शकत नाहीत, असे संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तत्व रावान्ची यांनी सांगितले. चर्चेयोग्य वातावारण निर्मिती अद्याप तयार झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करा आणि वाढता तणाव निवळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना, तसेच कारवाई करा, असे परिषदेने संबंधित पक्ष व या क्षेत्रातील सर्वच देशांना सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करून तणाव कमी करत चर्चेवर भर द्या, असे वेगळ्याने आवाहन बि‘टन, फ‘ान्स आणि जर्मनीने केेले आहे.